पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे दौऱ्यावर आहेत. या पुणे दौऱ्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच अजित पवार यांच्या अध्यक्षतेत पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक देखील आज पार पडली.पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या बैठकीत राज्यसभा खासदार म्हणून शरद पवार उपस्थित होते. विशेष म्हणजे शरद पवार हे बैठकीसाठी 5 मिनिटे आधीच सभागृहात नियोजित जागेवर बसले होते. त्याच्या नंतर आलेल्या अजित पवार मात्र काही खुर्च्या सोडून बसले होते. या बैठकीदरम्यान अजित पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे बसलेल्या बाजूला बघणेही टाळले. त्यामुळे, पुण्यातील या डीपीडीसी बैठकीची पुणे जिल्ह्यात आणि राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली.
या बैठकीला शरद पवार देखील उपस्थित राहण्याची शक्यता आधीच वर्तवली जात होती. त्यानुसार आज पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार आमनेसामने आले होते.शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांसह अजित पवार सत्ताधारी शिवसेना-भाजपसोबत सामिल झाल्यानंतर या काका-पुतण्यातील वाद वाढत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार पुन्हा शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ आणि शरद पवार यांची भेट झाली होती. आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार आज पुण्यात आमनेसामने आले. मात्र, त्यांनी एकमेकांकडे बघणेही टाळले. यामुळे राजकीय चर्चेला वेग आला आहे.
शरद पवार -अजित पवार आमने सामने,पण एकमेकांकडे बघणेही टाळले
Date:

