पुणे-गोवा राज्यात केवळ मद्य विक्री असलेली दारु सौंदर्य प्रसाधनाच्या नावाखाली ट्रकमध्ये भरुन ती तस्करी केली जात असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सासवड पथकाने सातारा-पुणे रस्त्यावर हाॅटेल जगदंबासमाेर आलेल्या एका संशयित ट्रकवर छापा टाकला. यावेळी सदर १४ चाकी ट्रक मध्ये एक काेटी २८ लाख एक हजार ६०० रुपये किंमतीचा विदेशी मद्याचा व ट्रक आणि माेबाईल असा एक काेटी ५१ लाख सहा हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी दिली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सासवड पथकास गाेपनीय माहिती मिळाली हाेती की, केवळ गाेवा राज्यात विक्रीकरिता असलेल्या मद्याची माेठया प्रमाणात अवैधरित्या तस्करी केली जात आहे. त्याअनुंषगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकाने विशेष माेहीम राबवून वाहनांची तपासणी महामार्गावर सुरु केली हाेती. त्यावेळी खेड शिवापूरचे हद्दीत हाॅटेल जगदंबा समाेर सातारा पुणे रस्त्यावर संशयित ट्रक एचआर ६३ डी ८८७८ हा १४ चाकी ट्रक थांबवण्यात आला. सदर ट्रक चालक याच्याकडे संबंधित वाहनात काय आहे याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकाने चाैकशी केली. त्यावेळी वाहनचालकाने संशयितरित्या उत्तरे दिल्याने वाहन रस्त्याचे बाजूस घेऊन तपासणी करण्यात आली.
त्यावेळी वाहनात गाेवा राज्यात निर्मिती व विक्रीस असलेले राॅयल ब्लु माल्ट व्हिस्कीच्या १८० मिली क्षमतेच्या ७९ हजार ६८० सीलबंद बाटल्या (१६६० बाॅक्स), राॅयल ब्लु माल्ट व्हिस्कीच्या७५० मिली क्षमतेच्या ६४८० सीलबंद बाटल्या (५४० बाॅक्स) घटनास्थळी मिळून आले.या कारवाईत भारत बेंझ कंपनीच्या ३७२३ आर माॅडेलचा १४ चाकी ट्रक देखील जप्त करण्यात अाला असून ट्रक चालक सुनील चक्रवर्ती यास अटक कण्यात आली आहे. वाहन चालकाकडे मद्य वाहतकुीचे संर्दभातील काेणताही वाहतूक पास, परवाने अथवा काेणतीही कागदपत्रे मिळून आलेली नाही. सदरचा मद्यसाठा विक्री करण्याचे उद्देशाने वाहतूक करुन आणल्याचे आराेपीचे तपासातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी आराेपीवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ), (ई), ८०, ८१, ८३, ९०, १०३, १०८ नुसार सासवड विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हयाचा पुढील तपास प्रदीप माेहिते दुय्यम निरीक्षक हे करत आहे.

