पुणे – हवामान बदलाचा परिणाम सर्वत्र दिसत आहे. दुष्काळी भाग जिथे सलग तीन दिवस पाऊस पडत नसे. तिथे आता ढगफुटी होऊन पूर येऊ लागला आहे. हवामान बदलामुळे दुबईत पूर आला. परदेशात वणवे पेटत आहेत. शहरे पाण्याखाली येत आहेत. पर्यावरणाला आता गंभीरपणे घ्यायला हवे. न जन्मलेल्या भावी पिढीला आपण कोणती पृथ्वी देणार आहोत? पृथ्वी, पर्यावरण हे विकत घेता येत नाही. हा प्रश्न सामुदायिकपणे सोडविण्याची गरज असल्यानेच वनराई संस्थेने यंदाच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. तसेच आदिवासी लोककलेच्या प्रचार-प्रसारासाठी ‘आदिवासी तारपा लोकनृत्याच्या’ सादरीकरणाचेही आयोजन करण्यात आले आहे.
वनराई संस्थेच्या आवारात मित्र मंडळ चौक, पर्वती येथे हे प्रदर्शन बुधवार, दिनांक १० जुलै रोजी सायंकाळी ४:०० ते रात्री ९:०० वाजेपर्यंत असून सर्वांसाठी विनामुल्य प्रवेश आहे. याचे उद्घाटन सकाळी पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते होणार आहे. सकाळच्या सत्रात विविध शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी यांना ही प्रतिकृती पाहायला मिळणार आहे तर दुपारी ४ नंतरच्या सत्रात नागरिकांसाठी ही प्रतिकृती पहायला मिळणार आहे. राज्यभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या स्नेहमेळाव्यासाठी येणार आहेत.
वनराई चे संस्थापक पद्मविभूषण डॉ.मोहन धारिया यांनी जल-वन आणि ग्रामीण विकासामध्ये मुलभूत योगदान दिले. सध्या त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू असून त्यांच्या कार्याला समर्पित मृदा-जल-वन संवर्धनातून शाश्वत ग्राम विकासाच्या विषयावर हे वर्ष साजरे केले जात आहे. म्हणूनच या जन्मशताब्दी वर्षातल्या वर्धापन दिनाच्या औचित्याने हे आगळेवेगळे प्रदर्शन भरविण्यात येत आहे.
वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया म्हणाले की, वनराईने लोकसहभागातून स्वच्छ, हरित, संपन्न व जलसमृद्ध गावांची निर्मिती केली. यातूनच शाश्वत ग्राम विकासाची गंगा गावागावात वाहू लागली. पश्चिम महाराष्ट्र, कोकण व मराठवाडा, तसेच गोवा, गुजरात आणि कर्नाटकच्या विविध भौगोलिक पार्श्वभूमी असलेल्या गावांमध्ये शाश्वत ग्रामीण विकास प्रकल्पांद्वारे ‘शहरातून खेड्याकडे’ स्थलांतर (Reverse Migration) घडवून आणण्यात वनराईने यश मिळवले. वनराईचे उपक्रम स्थानिक ग्रामस्थांची गरज लक्षात घेऊन आणि लोक सहभागातून राबविले जातात. तसेच गावखेड्यांचा विकास झाला तरच देशाची प्रगती होईल अशी वनराईची धारणा असल्याने पर्यावरण संवर्धनाबरोबरच ग्रामीण विकासविषयक जनजागृती घडवून आणण्यासाठी “वनराई” संस्था नेहमी कार्यरत असते. कृषी-ग्रामीण विकासाच्या आणि पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला पाठबळ मिळावं या हेतूने ‘स्नेहमेळावा आणि पर्यावरण प्रदर्शनाचे’ दरवर्षी वर्धापन दिनी आयोजन करण्यात येते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ग्रामस्थ, सरपंच, पर्यावरणप्रेमी आणि विद्यार्थी या स्नेहमेळाव्याला आणि प्रदर्शनाला आवर्जून हजेरी लावतात. पर्यावरण जनजागृतीच्या या उपक्रमामध्ये पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन धारिया यांनी केले आहे.
वनराईचे सचिव अमित वाडेकर म्हणाले की, भारतभूमी हरित आवरणाने सदैव नटलेली असावी, इथली पडीक जमीन आणि रिकामे हात सदैव उत्पादनक्षम असावेत, स्वच्छ आणि सुंदर परिसर हा इथला प्रत्येकाचा ध्यास असावा, इथले जलस्त्रोत शुध्द पाण्याने नेहमीच खळाळत असावेत, आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानयुक्त साधनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत व्हावा हे पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया तथा अण्णा यांचे स्वप्न होते. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं संस्थात्मक रुप म्हणजे वनराई आहे. याच वनराई संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त मृदा-जल-वन संवर्धनातून शाश्वत ग्राम विकास कसा केला जातो याबद्दलची भव्य प्रतिकृती पुणेकरांना पाहता येणार आहे.

