ट्रकचा करत होते पाठलाग
नाशिक -येथे अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या ट्रकने उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाच्या कार उडवल्या आहेत. यामध्ये चालक ठार, 3 कर्मचारी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, लासलगाव-चांदवड रस्त्यावर असलेल्या हरनुल या ठिकाणी ही घटना घडली आहे. सीमाशुल्क विभागाच्या वाहनांकडून अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठलाग केला जात होता. मात्र यावेळी या ट्रकने पथकाच्या गाड्या उडवल्या. या अपघातामध्ये सीमा शुल्क विभागाचा चालक जागीच ठार झाला आहे. तर लासलगाव येथील पोलिस ठाण्याचे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास चांदवड परिसरामध्ये अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. यानुसार सीमा शुल्क विभाग तसेच लासलगाव पोलिस यांच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यासाठी सीमा शुल्क विभागाच्या वाहनात संबंधित अधिकारी व कर्मचारी या ट्रकचा पाठलाग करत होते. यावेळी लासलगाव-चांदवड रस्त्यावर असलेल्या हरनुल या ठिकाणी अपघात झाला.
या अपघातात सीमा शुल्क विभागाचा वाहनाचा चक्काचूर झाला. तसेच चालक कसबे हे जागीच ठार झाले आहेत. लासलगाव पोलिस स्टेशनचे कर्मचारी डोंगरी व निकम हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र राज्यात सातत्याने घडणाऱ्या या घटना पाहता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.