आरोग्य प्रमुखांऐवजी सहाय्यक आरोग्य प्रमुखांकडूनच लाखोंच्या बिलांवर स्वाक्षर्या
पुणे : आयुक्तांच्या लेखी आदेशानंतरही आरोग्य प्रमुखांऐवजी सहाय्यक आरोग्य प्रमुखांकडूनच सर्व बिलांवर स्वाक्षर्या केल्या जात असताना लेखा विभागही ही बिले मंजूर करत असल्याचे निदर्शनास येत असल्याने . बिले पाठविण्यापासून ती मंजुर करण्यापर्यंत मोठ्याप्रमाणावर आर्थिक व्यवहार होत असल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे औषधांची खरेदी, शहरी गरीब योजना तसेच सीएचएस योेजनेअंतर्गत खाजगी रुग्णालयांची उपचारांची बिले, तसेच अन्य खरेदी आणि कामे केली जातात. खरेदी तसेच विकास कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येते. तसेच उपचारासंदर्भातील योजनांसाठी शहरातील बहुतांश मोठ्या रुग्णालयांसोबत करार करण्यात आले आहेत. ही सर्व बिले आरोग्य विभागामार्फत रितसर प्रक्रिया पार पाडून संबधित रुग्णालय आणि पुरवठादार, ठेकेदारांना अदा केली जातात.तत्कालीन महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी ऑगस्ट २००७ मध्ये आरोग्य विभागासाठी परिपत्रक काढून ३० हजार ते एक लाख रुपयांपर्यतचे अधिकार सहाय्यक आरोग्य प्रमुख, एक ते तीन लाखांपर्यंतचे उपआरोग्य प्रमुख आणि तीन ते दहा लाखांपर्यंतच्या बिलांवरील स्वाक्षरीचे अधिकार आरोग्य प्रमुखांकडे राहातील, असे आदेश काढलेले आहेत. त्यावरील रकम्च्या बिलांचे अधिकारी अतिरिक्त आयुक्तांकडे देण्यात आलेले आहेत.
दरम्यान, दोन वर्षांपुर्वी प्रशासनाने पारदर्शक आणि गतीमान कामकाज व्हावे यासाठी ऑनलाईन बिलींगसाठी ‘सॅप ’सिस्टिम सर्वच विभागांसाठी सुरू केली. सध्या सर्व बिले मॅन्युअल फाईलसोबतच सॅप सिस्टिमच्या माध्यमातूनच लेखा विभागाकडे पाठविण्यात येतात. यासोबतच संबधित विभागाकडून बिले व संबधित स्वाक्षरी केलेले निवेदन व अन्य कागदपत्रांसह फाईलही देण्यात येते. परंतू सध्या अगदी दहा लाखांपुढील बिलांवर आणि सॅप सिस्टिमद्वारे सादर केलेल्या बिलांवर देखिल सहाय्यक आरोग्य प्रमुखांच्या स्वाक्षर्या असल्याचे दिसून येत आहे. विशेष असे की अगोदर मॅन्युअल बिल तयार होते, त्यावर आरोग्य प्रमुखांच्या स्वाक्षर्या असतात. मात्र, सॅपद्वारे सादर झालेल्या बिलांच्या प्रिंटवर केवळ सहाय्यक आरोग्य प्रमुखांचीच स्वाक्षरी असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रत्यक्षात सॅपद्वारे सादर होणारे बिल हे प्रक्रियेत नंतर तयार होते. खरेतरी मॅन्युअल बिल लेखा विभागाकडे पाठवितानाच सॅपद्वारे देखिल पाठविणे गरजेचे असते. मात्र, या बिलांमध्ये देखिल काही दिवसांचे अंतर राहील्याचे निदर्शनास येत आहे. बिलांच्या रकमेनुसार त्यावर कोणाच्या स्वाक्षर्या आहेत, हे देखिल तपासले जाते की नाही? असा संशय निर्माण होतो आहे.