मुंबई -ससून रुग्णालयातील गैरप्रकारावरुन आज विधिमंडळात विरोधी पक्षांच्या आमदारांनी या रुग्णालयात होणऱ्या कारभाराचे वाभाडे काढले. यामध्ये आमदार रवींद्र धंगेकर, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम, जयंत पाटील, यशोमती ठाकूर यांचा समावेश आहे. विरोधकांच्या प्रश्नाला मंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
या संदर्भात काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, ” ससूनला मी सातत्याने जात असतो. तिथे रुग्णांना सुविधा दिल्या जात नाहीत. ससून हा गुन्हेगारांचा अड्डा झाला आहे. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ससूनमध्ये पैसे मागणाऱ्या डॉक्टरांवर काय कारवाई केली? संजीव ठाकूर यांना निलंबित का केले जात नाही? पुण्यात आरोग्य प्रमुख नाही. आरोग्य प्रमुखची बदली का केली? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
तर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, ससून रुग्णालय आता ड्रग्ज माफियांचे केंद्र झाले आहे. ससून रुग्णालयाला फाईव्ह स्टार घोषित केले पाहिजे. सर्वात मोठ्या गुन्हेगाराला ससूनकडून संरक्षण दिले जाते. हे रुग्णलाय ड्रग्ज माफिया, गुन्हेगारांसाठी फाईव्ह स्टार करणार का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या की, ससून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या रुग्णलयात अनेक पदे रिक्त आहेत. नवजात बालके आणि गर्भवती महिलांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात होत आहे. या रुग्णालयातील रिक्त पदे कधी भरली जाणार? असा प्रश्न त्यांनी राज्य सरकारला विचारला. तर विश्वजित कदम यांनी गरीब उपचारासाठी तेथे जातात. त्यानंतर डॉक्टर रुग्णांना प्रिस्क्रिप्शन देतात. मात्र ससूनच्या मेडिकलवर औषधे उपलब्ध नसतात. हे मेडिकल आणि रुग्णालयाचे रॅकेट असते. त्या औषधाच्या जागी दुसरे महाग औषध रुग्णांना दिले जात असल्याचा आरोप केला.
शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी ससूनवर लक्षवेधी घेण्याची विनंती केली. त्यावर अध्यक्षांनी मंगळवारी यावर लक्षवेधी घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच राज्यातील शासकीय रुग्णलयांत चांगली सेवा केली जाते. या रुग्णालयांची सेवा चांगली होण्यासाठी सरकारने विशेष कार्यक्रम घेऊन दोष दूर करण्यासाठी घ्यावा, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.