हा अर्थसंकल्प म्हणजे लबाडाघरचं आवताण-ठाकरे
रोजगार वाढीसाठी उपाययोजना नाही- उद्धव ठाकरे
मुंबई– राज्याच्या अर्थसंकल्पावर बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या आश्वासनांना आणि थापांना चिरडून लोकांनी जो दणका दिला आहे. त्यामुळे यांच्यात थोडाफार फरक पडलेला दिसतोय. परंतु महाराष्ट्राची जनता ही समजदार आहे. ही जनता सरकारच्या थापांना बळी पडणार नाही. हा गाजराचा अर्थसंकल्प आहे, यामध्ये आर्थिक तरतूद कुठेही दिसत नसल्याचेही ठाकरे म्हणालेत.
ठाकरे पुढे म्हणाले की, काहीतरी धुळफेक करायची जनतेला फसवायचं आणि पुन्हा सत्तेत येऊन जनतेला लुटण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही ठाकरे म्हणाले. आजचा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी, थापांचा महापूर आहे. सर्वच घटकाला सोबत घेऊन जाण्याचं हे खोटं नरेटिव्ह असल्याचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
आजपर्यंत ज्या घोषणा महायुतीने केल्या त्याबाबत तज्ञांची कमेटी नेमून निवडणुकीपूर्वी श्वेतपत्रिका जाहीर करण्यात यावी. अनेक योजना अशा आहेत, ज्या घोषित झाल्या परंतु प्रत्यक्षात अंमलात आलेल्या नाही आहेत. महिलांना आपल्या बाजूने करण्याचा केविलवाणा प्रयत्न या अर्थसंकल्पाद्वारे करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. मुलींसाठी लाडकी लेक योजना आणत आहात मात्र दुसरीकडेही मुलांसाठीही एखादी योजना आणा, अशी मागणीही ठाकरेंनी यावेळी केली.
राज्यात हजारो तरूण बेरोजगार आहेत. रोजगार वाढीसाठी काहीही उपाययोजना या अर्थसंकल्पात नाही आहेत. शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याची मागणी केली होती. ती मान्य केली मात्र शेतकरी कर्जमुक्त करण्याची मागणी सरकारने मान्य केली नाही. बियाणे, खते, औषधे यावरचा जीएसटी कमी करण्याचा निर्णय आम्ही घेणार असल्याचे जाहीरनाम्यात आम्ही सांगितलेलं असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले. एका बाजूने शेतकऱ्यांना लुटण्याचे काम चालू आहे. दुसरीकडे मलमपट्टी करण्याचे काम सरकार करत असल्याचेही ठाकरे यावेळी म्हणाले.
शेतकरी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनता ही विधानसभेच्या निवडणुकांची वाट पाहत आहेत. हे लबाडा घरचं आवताण आहे. पंधरा लाख रुपयांबद्दलही आता कोणीही बोलत नाही. हा अर्थसंकल्प आहे की ही जुमलाबाजी आहे, असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
ते पुढे म्हणाले- वारकऱ्यांना पैशांची काही एक देणंघेणं नाही, मात्र त्यांनाही विकत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते केवळ विठूरायाच्या नावाखाली वारी करतात. मात्र त्यांनाही विकत घेण्याचा प्रयत्न आहेत.