पुणे : श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे यंदाचा लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार प. पू. श्री कलावती आईंचे अध्यात्मिक कार्य प्रगतीपथावर नेण्यासाठी अविरत कार्यरत असलेल्या बेळगाव येथील परमार्थ निकेतन संस्था, पत्रकार अर्चना मोरे पाटील व यांना प्रदान करण्यात येणार आहे. दत्त महाराजांची प्रतिकृती, रुपये २५ हजार रुपये सन्मानराशी, महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरुप असणार आहे, अशी घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष राजू बलकवडे यांनी केली.
दत्तमंदिराच्या १२७ व्या वर्धापनदिनानिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते. त्यामध्ये पहाटे लघुरुद्र ट्रस्टचे उत्सव उपप्रमुख अक्षय हलवाई यांच्या हस्ते पार पडला. तर, प्रात: आरती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांच्या हस्ते झाली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष राजू बलकवडे, कार्यकारी विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी, खजिनदार अॅड.रजनी उकरंडे, उत्सव प्रमुख सुनिल रुकारी, उत्सव उप प्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त युवराज गाडवे, अॅड.शिवराज कदम जहागिरदार, महेंद्र पिसाळ उपस्थित होते.
कार्यकारी विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी म्हणाले, मंदिराच्या संस्स्थापिका श्रीमती लक्ष्मीबाई यांची स्मृती चिरंतन रहावी यासाठी ट्रस्ट तर्फे प्रतीवर्षी धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक, कला, क्रिडा, पत्रकारीता तसेच वैय्यक्तिक निपुणता या विविध क्षेत्रातील एकून तीन कर्तुत्ववान महिलांचा व संस्थांचा ह्णलक्ष्मीबाई स्मृती पुरस्कारह्ण प्रदान करून गौरविण्यात येते. या वर्षी धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प. पू. कलावती आईंचे अध्यात्मिक कार्य प्रगतीपथावर नेण्यासाठी अविरत कार्यरत असलेल्या बेळगाव येथील परमार्थ निकेतन या मातृसंस्थेला प्रदान करण्यात येणार आहे.
पत्रकारितेमध्ये गुन्हेगारी या अत्यंत धोकादायक क्षेत्रातील नितांत धडाडीच्या महिला पत्रकार अर्चना मोरे पाटील यांना देण्यात येणार आहे. आपल्या सुमारे १८ वर्षांच्या पत्रकारीतेमध्ये त्यांनी अनेक पदांवर काम करीत असताना घटनेचा सखोल मागोवा व पाठपुरावा करून निर्भीडपणे बातमी प्रकाशित करण्याचा आपला यशस्वी प्रयास स्पृहणीय आहे.
रेश्मा पुणेकर ही राष्ट्रीय महिला बेसबॉल संघाची कप्तान आहे. लहानपणी बक-या चारणारी बारामतीची रेश्मा हीची भारतीय महिला बेसबॉल संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. तिने अनेक राष्ट्रीय व राज्य स्तरावर महाराष्ट्राचे यशस्वी नेतृत्व केले आहे. नुकताच तिला महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातला अत्यंत सुप्रतिष्ठित शिवछत्रपती पुरस्कार घोषित झाला आहे.
मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवारी सकाळी श्री दत्त महाराजांची सालंकृत पूजा करण्यात आली. माध्यान्ह आरती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने यांच्या हस्ते तर ट्रस्टचे उत्सवप्रमुख अक्षय गोडसे व सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते सायं आरती झाली. रात्री शेजारती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्या हस्ते झाली. रात्री गुरुवारनिमित्त नित्य पालखी प्रदक्षिणा देखील झाली.
*दत्तभवनमध्ये ‘लक्ष्मीबाई आरोग्य मंदिर’ या रक्तसंकलन व तपासणी केंद्राचे उद्घाटन
गरजू व कमी उत्पन्न गटातील नागरिकांसाठी दत्त मंदिरासमोरील दत्तभवन या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर लक्ष्मीबाई आरोग्य मंदिर या कायमस्वरूपी रक्तसंकलन व तपासणी केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. दत्त मंदिर ट्रस्ट व गुरुनानक मेडिकल फाऊंडेशन तसेच सकाळ सोशल फौंडेशनच्या सहयोगाने हा उपक्रम होत आहे. आरोग्य केंद्राचा शुभारंभ पुणे मनपा आरोग्य उपप्रमुख डॉ. संजय वावरे यांच्या हस्ते झाला.
प्रविण मसालेचे चेअरमन राजकुमार चोरडिया, सूर्यदत्त ग्रुपचे डॉ. संजय चोरडिया, तसेच मुकुंद भवन ट्रस्टचे पुरूषोत्तम लोहिया, आदी उपस्थित होते. गुरूनानक फौंडेशनचे अध्यक्ष चरणजीतसिंग साहनी व चेअरमन संत सिंग मोखा यांनी हे केंद्र उभारणीस मदत केली. महेंद्रसिंग खंडूरी यांनी या केंद्रात रुग्णांना अल्पदरात रक्त चाचणी, ईसीजी, दंत चिकित्सा व सिटी स्कॅनची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विश्वस्त ॲड. शिवराज कदम जहागिरदार यांनी केले. खजिनदार ॲड. रजनी उकरंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.