महावितरणच्या १७५ अभियंते, कर्मचाऱ्यांसह वीजयंत्रणा सज्ज
पुणे, दि. २५ जून २०२४:जगदगुरू संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्यांसाठी महावितरणकडून पुणे परिमंडल अंतर्गत वीजसुरक्षा व प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा जागर करण्यात येणार आहे. यासोबतच पालखी मार्गावर सुरळीत वीजपुरवठा व वीजसुरक्षेसाठी ३५ अभियंता व १४० कर्मचाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. पालखी मार्गावरील वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरूस्तीचे कामे पूर्णत्वास गेली असून मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार विविध ठिकाणी भेटी देऊन या कामांचा आढावा घेत आहेत.
आषाढी यात्रेनिमित्त पुणे परिमंडल अंतर्गत भोसरी, पिंपरी, रास्तापेठ, राजगुरुनगर व मुळशी विभागांच्या कार्यक्षेत्रात जगदगुरू संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा पालखी सोहळा रविवारी (दि. ३०) ते मंगळवार (दि. २ जुलै) पर्यंत होणार आहे. या विभागांतील पालखी मार्गावर, विसावा व मुक्कामाच्या ठिकाणी अतिरिक्त स्वरुपात रोहित्रे व इतर साधनसामग्री तयार ठेवण्यात आली आहे. वीज सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आली आहे. आवश्यक ठिकाणी मोबाईल ट्रॉन्सफॉर्मरद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. सोबतच सामाजिक बांधिलकी म्हणून महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांकडून पिण्याचे पाणी, फळ, अल्पोपाहार आदींची सेवा देण्यात येणार आहे.
पालखी सोहळ्यात यंदा महावितरणकडून वीजसुरक्षेचा विशेष व प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा जागर करण्यात येणार आहे. यामध्ये माहिती पत्रके, दृकश्राव्य माहितीपट, छोटेखानी प्रदर्शनी, वीजसुरक्षेबात संवाद, प्रात्यक्षिक आदींच्या माध्यमातून माहिती देण्यात येणार आहे.
पुणे परिमंडल अंतर्गत संपूर्ण पालखी सोहळा मार्गावर तसेच मुक्कामाच्या ठिकाणी व परिसरातील वीज यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने आळंदी देवस्थानाजवळ प्रदक्षिणा मार्गावरील ३१५ मीटर तारांची उपरी वाहिनी काढून तेथे इन्सूलेशन असलेली एरिअल बंच वाहिनी लावण्यात आली आहे. तसेच पालखी मार्गावरील रोहित्रांना वीजसुरक्षेसाठी फायबर रीइन्फोर्स प्लॅस्टिकपासून तयार केलेले नव्या तंत्राचे मजबूत व टिकाऊ संरक्षक जाळ्यांचे कुंपण लावण्यात आले आहे. यासोबतच उपरी वीजवाहिन्या भूमिगत करणे, अर्थिंग, उच्चदाब व लघुदाब वाहिन्यांची तसेच रोहित्रांसहकुंपणाची देखभाल व दुरुस्तीची कामे, फिडर पिलर्सची दुरूस्ती, डिस्क इन्सूलेटर बदलणे, झोल पडलेल्या तारा ओढणे, तारांना स्पेसर्स लावणे, वाकलेले खांब सरळ करणे, गंजलेले वीजखांब बदलणे आदी कामे करण्यात आली. पालखी सोहळ्याच्या कालावधीत मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्यासह संबधित विभागाचे कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता विविध ठिकाणी भेटी देणार आहेत.
पालखी मार्गावर किंवा मुक्कामाच्या दरम्यान कोणत्याही व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीजयंत्रणेपासून सावध व सतर्क राहावे. वीजखांब, फिडर पिलर, डीपी बॉक्स किंवा अन्य ठिकाणच्या वीज यंत्रणेपासून सुरक्षित अंतर ठेवावे. वीजविषयक कोणतीही तक्रार असल्यास २४ तास सुरु असलेल्या १९१२ / १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महावितरणने केले आहे.
राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल – पालखी सोहळ्यांचे स्वागत करण्यासाठी महावितरण सज्ज आहे. सोहळ्याच्या कालावधीत सुरळीत वीजपुरवठ्यासह भाविकांच्या वीजसुरक्षेबाबत विशेष खबरदारी घेण्यात येईल. तसेच मागणीप्रमाणे तात्पुरती वीज जोडणी देखील तात्काळ उपलब्ध होणार आहे. वीजसेवेबाबत काही अडचणी असल्यास भाविकांनी किंवा स्वयंसेवकांनी संबंधित अभियंता/ कर्मचारी किंवा महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

