ओडिशातून मुंबई आणि पुण्याला अंमली पदार्थांची तस्करी –चौघेही तस्कर पुण्याचे-कल्याण–निर्मला राष्ट्रीय महामार्गावर नांदेडहून आलेली कार पकडली- २ कोटीचा 111 किलो गांजा हस्तगत –मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
पुणे-मुंबई आणि पुणे शहरात ड्रग्स विक्री आणि सेवनाच्या घटना समोर येत आहेत. पुण्यातील एफसी रोडवर एका हॉटेलमध्ये ड्रग्स सेवन करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाई केली. मुंबई आणि पुण्यात अंमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा नार्कोटिक्स ब्युरोने पर्दाफाश केला आहे. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींकडून 111 किलो गांजा व स्विफ्ट कार जप्त केली आहे.
याप्रकरणी एस मोरे, एल शेख, आर मोहिते आणि एस शेख या चार संशयित आरोपींना अटक केली आहे. चौघेही तस्कर पुण्याचे रहीवासी असून ते ओडिशातून मुंबई आणि पुण्याला अंमली पदार्थांची तस्करी करीत होते. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत दोन कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. एनसीबीने ही कारवाई रविवारी पहाटे सहाच्या सुमारास अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील माहामार्गावर सापळा लावून केली.नांदेड जिल्ह्यातून मुंबईकडे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची माहिती एनसीबी ला मिळाली होती. त्यानुसार एनसीबीने रविवारी पहाटे नांदेड येथून अंमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या स्विफ्ट कारचा पाठलाग केला. ही कार पाथर्डी तालुक्यात असणाऱ्या करंजी गावाजवळ असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील दगडवाडी फाटा येथे अडवण्यात आली. पथकाने कारची तपासणी केली असता त्यामध्ये 111 किलो गांजा आढळून आला.
कल्याण-निर्मला राष्ट्रीय महामार्गावरुन अमली पदार्थाची वाहतूक होणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सकाळपासूनच सापळा रचला होता. पाळत ठेवलेले वाहन दगडवाडी फाट्याजवळ थांबवले. त्यातील चारजण एका उपहारगृहात जाताना पथकाने या वाहनाची झडती घेतली यामध्ये सहा पोत्यात गांजा आढळला. पथकाने चौघांना लगेच ताब्यात घेतले. या कारवाईची माहिती पाथर्डी पोलिसांना देऊन पोलीस चौघांना घेऊन मुंबईकडे रवाना झाले. कारवाई पूर्ण झाल्यानंतर माहिती दिली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

