नवी दिल्ली – देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून झालेल्या दोन चुकांमुळे काश्मीरला पुढची अनेक वर्षं अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या, असा दावा अमित शाह यांनी आपल्या भाषणात केला.एवढेच नाही तर नेहरूंच्या चुकीमुळे पाकव्याप्त काश्मीरचा जन्म झाला अन्यथा तोहो भारतातच असता असे ते म्हणाले.
पंडित जवाहरलाल नेहरूंची पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे जेव्हा आपलं सैन्य जिंकत होतं पण पंजाबचा भाग येताच त्यांनी युद्धबंदी केली. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरचा जन्म झाला. जर युद्धबंदी तीन दिवस उशीरा झाली असती, तर आज पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग असता”, असा दावा अमित शाह यांनी यावेळी केला. दरम्यान, अमित शाहा यांच्या या दाव्यावरून काँग्रेस खासदारांनी आक्रमक होत आरडाओरड करायला सुरुवात केली.नेहरूंची दुसरी चूक म्हणजे संयुक्त राष्ट्रात भारत-पाकिस्तान वादाचा मुद्दा नेणं असं अमित शाह म्हणाले. “दुसरी चूक म्हणजे संयुक्त राष्ट्रात आपला मुद्दा घेऊन जाण्याची चूक. एका पत्रातल्या मजकुरातला एक भाग मी वाचून दाखवतो”, असं म्हणत अमित शाह यांनी हातातील कागदावरचा एक मजकूर वाचून दाखवला.“पंडित जवाहरलाल नेहरूंनी शेख अब्दुल्लांना लिहिलेलं हे पत्र आहे. ‘संयुक्त राष्ट्राच्या अनुभवानंतर मी या निष्कर्षावर पोहोचलोय की तिथून कोणत्याही समाधानकारक उत्तराची अपेक्षा ठेवली जाऊ शकत नाही. मला युद्धबंदी हा एक चांगला निर्णय वाटला. पण या मुद्द्यावर योग्य पद्धतीने उत्तर शोधलं गेलं नाही. आम्ही युद्धबंदीवर अधिक विचार करून काही चांगला पर्याय शोधू शकलो असतो. मला वाटतं की भूतकाळात ही आमच्याकडून झालेली चूक आहे”, असा उल्लेख असलेला मजकूर अमित शाह यांनी वाचून दाखवला.“विरोधक विनाकारण माझ्यावर चिडचिड करत आहेत. मी नेहरूंचं पत्र वाचून दाखवत आहे. त्यांना चिडचिड करायचीच असेल, तर त्यांनी नेहरूंवर करायला पाहिजे”, असंही अमित शाह म्हणाले.
कोणत्या कलमानुसार निर्णय व्हायला हवा होता?
दरम्यान, संयुक्त राष्ट्रांकडे वेगळ्या कलमानुसार नियम उपस्थित करायला हवा होता, असंही अमित शाह यांनी यावेळी नमूद केलं. “जेव्हा संयुक्त राष्ट्रांत मुद्दा न्यायचा होता, तेव्हाही घाईगडबडीत निर्णय घेतला गेला. हा मु्द्दा संयुक्त राष्ट्र नियमावलीतील कलम ३५ ऐवजी ५१ नुसार न्यायला हवा होता. अनेक लोकांनी सल्ला देऊनही तो निर्णय घेण्यात आला”, असा दावाही अमित शाह यांनी यावेळी केला.

