पुणे – महापालिकेच्या औंध येथील जकात नाक्याच्या जागेवर पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपीएमएल) डेपो उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी काल बुधवारी दिली.
राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी जकात कर रद्द केला. त्यानंतर शहराच्या सीमेवर असलेल्या जकात नाक्यांच्या मोठमोठ्या जागा ओस पडल्या. या ओस पडलेल्या जागांवर पीएमपीचे पार्किंग व्हावे किंवा सरकारी कार्यालये उभी करावीत आणि त्याचा वापर करावा, असे पर्याय पुढे आले. पण, त्याबाबतचा ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे जकातनाक्यांच्या जागा मोकळ्या राहिल्या. औंध येथे तर जकात नाक्याच्या दिवाळखोरीत निघालेल्या ट्रान्स्पोर्ट कंपन्यांनी आपल्या गाड्या त्या ओस पडलेल्या जकातनाक्याच्या जागेवर आणून लावल्या. याबद्दल नागरिकांनी तक्रारी केल्या.
सुमारे ७० बस कचरा आणि ढिगाऱ्यात पडून आहेत. काल दिनांक १२ मे रोजी PMPML चे CMD संजय कोलते आणि PMPML चे वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विस्तृत आढावा बैठक घेतली.
PMPML लोगो असलेल्या या बसेस प्रत्यक्षात PMPML च्या दिवाळखोर ठेकेदारांच्या आहेत, PMPML च्या नाही. या बसेसच्या मालकांनी आश्वासन दिले आहे की ते प्लॉटमधून बसेस त्वरित हलवणार आहेत.
बसेस आणि कचरा यापासून हा परिसर मोकळा झाल्यानंतर, त्या ठिकाणी एक नवीन, सुस्थितीत बस डेपो आणि पार्किंग सुविधा स्थापन केली जाणार आहे अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.