डोंबिवली एमआयडीसी मध्ये महिनाभरापूर्वी लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच आज पुन्हा फेज-2 मध्ये आग लागली. या वेळी स्फोटांचे मोठे आवाज आल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कंपनीमध्ये अनेक कामगार अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे. आग एवढी प्रचंड आहे की, दुरपर्यंत स्फोटाचे आवाज आणि धुराचे लोट पसरले आहेत. या परिसरात अभिनव नावाची शाळा देखील आहे. त्यामुळे भीती जास्त वाढली होती. मात्र, शाळेतील विद्यार्थ्यांना तात्काळ घरी पाठवण्यात आले आहे.
डोंबिवलीत 12 जून रोजी आगीची घटना घडली होती. त्या घटनास्थळा पासून अवघ्या 300 मीटर अंतरावर आगीची दुसरी घटना घडली आहे. अभिनव विद्यालयाजवळील इंडो अमाईन्स या केमिकल कंपनीत ही आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे (केडीएमसी) मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या आग विझवण्याचे काम करत आहेत.
डोंबिवली एमआयडीसीमध्ये पुन्हा एकदा स्फोट झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्या कंपन्यांमध्ये आग लागत आहेत त्यांचे फायर ॲाडीट वेळेवर केले जाते का? सरकार अशा आगी का रोखू शकत नाही? या प्रश्नांची उत्तरे कोण देणार ? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने विचारण्यात आला आहे. या संदर्भात काँग्रेसच्या वतीने एका पोस्टच्या माध्यमातून सरकारवर टीका करण्यात आली आहे.
डोंबिवली पुन्हा हादरली:एका कंपनीनंतर शेजारील दुसऱ्या कंपनीला देखील आग
Date:

