पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरीलशिरोळे प्लॉटवरील विनापरवाना शॉपिंग मॉल पाडण्याचे काम सुरू असतानाच न्यायालयाने स्थगिती आदेश दिले होते. परंतू अवघ्या सहा महिन्यातच न्यायालयाने ही स्थगिती उठविल्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाने आज उर्वरीत मॉलही पाडून टाकला.
शिरोळे प्लॉटवर लोखंडी स्ट्रक्चरमध्ये दुमजली शॉपिंग मॉल उभारण्यात आला होता. सुमारे १२ हजार चौ.फूटाच्या या मॉलमध्ये पत्र्यांची पाटीशन्स करून सत्तर स्टॉलवजा दुकाने सुरू करण्यात आली होती. या मॉलसाठी कुठलिही परवानगी घेतली नसल्याने महापालिकेने आठ वर्षांपुर्वी नोटीस बजावत मॉल काढुन टाकण्याचे आदेश दिले होते. याविरोधात संबधित व्यावसायीकाने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली होती. मात्र मागीलवर्षी न्यायालयाने डिसेंबरमध्ये ही स्थगिती उठविल्यानंतर महापालिकेच्यावतीने तातडीने पावले उचलत कारवाई करून सुमारे सात हजार चौ.फुटांचे स्ट्रक्चर काढून घेतले.महापालिकेची कारवाई सुरु असतानाच न्यायालयात गेलेल्या व्यावसायीकाने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर दुपारी साडेचारच्या सुमारास पुन्हा स्थगिती आदेश दिले. यामुळे उर्वरीत कारवाई होउ शकली नव्हती. उच्च न्यायालयाने ही स्थगिती उठवल्यानंतर आज महापालिकेच्या यंत्रणेने मॉलचे उर्वरीत लोखंडी अँगल व पत्र्याचे स्ट्रक्चर पाडून टाकले. मॉल मुळे फर्ग्युसन रस्त्यावर वाहतुकीचा ताण येत होता. तसेच मॉल मध्ये हवा उजेडाची सोय नसल्याने आणि मॉल मध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहक आणि विक्रेते असल्याने आगी सारखी दुर्घटना घडली असती तर मोठ्या प्रमाणात जिवितहानी झाली असती. महापालिकेच्या बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश बनकर, कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली उपअभियंता सुनिल कदम, शाखा अभियंता राहुल रसाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

