पुणे-ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी येरवडा कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय मरसाळे यांना अटक केली.ललित पाटील प्रकरणात आतापर्यंत पुणे पोलिस दलातील 10 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय 2 पोलिसांना अटकही करण्यात आली आहे. या पोलिसांवर ललित पाटीलला ससून रुग्णालयातून पळून जाण्यात मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. ससून रुग्णालयातील जेल गार्ड मोईस शेख यालाही या प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावरही ललित पाटीलाल ससूनच्या वॉर्ड क्रमांक 16 मधून पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप होता.
ललित पाटील अंमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. त्यावेळी त्याने आजारी असल्याचा बहाणा केल्यानंतर त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याने तेथून नाशिक येथे ड्रग निर्मिती कारखान्यासह ड्रग रॅकेट सक्रिय केल्याचे तपासात निष्पन्न झाले. ललित पाटीलला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी डॉक्टर संजय मरसाळे यांनी शिफारस केली होती. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी त्यांना अटक केली. येरवडा कारागृहाचे डॉ. संजय मरसाळे यांनी आतापर्यंत कुणाकुणाला ससून रुग्णालयात दाखल होण्याचे शिफारस पत्र पाठवले याचा तपास पोलिस करत आहेत. तसेच त्यांनी या मोबदल्यात पैसे कसे व कोणत्या मार्गाने स्वीकारले याचाही शोध घेतला जात आहे.

