वेग वाढला; पुणे परिमंडलात दरमहा सरासरी २० हजार नवीन वीजजोडण्या कार्यान्वित
पुणे, दि. ०४ डिसेंबर २०२३: ‘इज ऑफ लिव्हिंग’नुसार ग्राहक सेवा देताना महावितरणच्या पुणे परिमंडलाने गेल्या डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३ या वर्षात विक्रमी २ लाख ३३ हजार ६०९ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत. त्यापूर्वी दोन-तीन वर्षांमध्ये नवीन वीजजोडणी देण्याचा दरमहा सरासरी वेग १५ हजार ते १६ हजार होता तो आता दरमहा १९ हजार ९०० वर गेला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ‘इज ऑफ लिव्हिंग’नुसार ग्राहकसेवा गतीमान करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी प्रामुख्याने ग्राहक तक्रार निवारण व नवीन वीजजोडण्यांना वेग देत ग्राहकसेवा आणखी गतिमान केली आहे. याबाबत परिमंडलस्तरावर संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांच्याकडून सातत्याने आढावा घेण्यात येत आहे.
पुणे परिमंडलामध्ये सन २०२२-२३ या आर्थिक वर्षांत १ लाख ९५ हजार ९८६ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या. त्याआधीच्या आर्थिक वर्षाचा विचार केल्यास दरमहा सरासरी १५ हजार ३५० ते १६ हजार ३५० वीजजोडण्या देण्यात येत होत्या. त्यानंतर नवीन वीजजोडण्यांना मोठा वेग दिल्याने डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३ पर्यंत वर्षभरात तब्बल २ लाख ३३ हजार ६०९ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित झाल्या आहेत. तर चालू आर्थिक वर्षांत एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंतच्या आठ महिन्यांमध्ये सर्व वर्गवारीच्या तब्बल १ लाख ५९ हजार २०९ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित झाल्या आहेत. त्यामुळे नवीन वीजजोडण्या देण्याचा वेग हा दरमहा सरासरी १९ हजार ९०० वर गेला आहे.
पुणे परिमंडल अंतर्गत नवीन वीजजोडण्या व आवश्यकतेनुसार वीजमीटरचा पुरवठा व्हावा यासाठी दर आठवड्यात दोनदा मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याकडून आढावा घेण्यात येत आहे. त्यामुळे नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया आणखी गतीमान झाली आहे. डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत कार्यान्वित झालेल्या विक्रमी २ लाख ३३ हजार ६०९ वीजजोडण्यांमध्ये घरगुती- १ लाख ९७ हजार १८०, वाणिज्यिक- २६ हजार ७३९, औद्योगिक- ३८२१, कृषी- २८२९ व इतर ३०४० वीजजोडण्यांचा समावेश आहे.
पुणे परिमंडलामध्ये मुबलक प्रमाणात नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. वीजमीटरबाबत किंवा नवीन वीजजोडणी संदर्भात काही तक्रार असल्यास ग्राहकांनी संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी थेट संपर्क साधावा. वीजग्राहकांना बाजारातून मीटर खरेदी करण्याची आवश्यकता नाही असेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
‘पीएमए’ योजनेत मागणीनुसार सर्व वीजजोडण्या कार्यान्वित– प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विविध ठिकाणी बांधलेल्या घरांना कोटेशनची रक्कम भरल्यानंतर महावितरणकडून तात्काळ नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. यामध्ये बोऱ्हाडेवाडी- १२९६, जाधववाडी सेक्टर १२- ३७२२, वडगाव खुर्द- ८१५, खराडी- ८६५, रामटेकडी- १२० अशा एकूण ६८१८ घरांच्या नवीन वीजजोडण्यांचा समावेश आहे. कोटेशन भरल्यानंतर या योजनेतील एकाही घराची नवीन वीजजोडणी सध्या प्रलंबित नाही.
श्री. राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल– ‘इज ऑफ लिव्हिंग’नुसार ग्राहकसेवेची अंमलबजावणी सुरू आहे. यामध्ये नवीन वीजजोडण्यांचा वेग आणखी वाढविण्यात आला आहे. त्यासाठी परिमंडलस्तरावर दर सोमवारी व गुरुवारी विभाग कार्यालयनिहाय आढावा घेण्यात येत आहे. त्याची फलनिष्पत्ती म्हणजे नवीन वीजजोडण्या देण्याचा दरमहा वेग एक वर्षापूर्वी १५ हजार ते १६ हजार होता तो आता दरमहा १९ हजार ९०० वर गेला आहे.

