पुणे : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर उभारणीचे मोठे यश हे हिंदू समाज संघटित झाल्यानंतरचे यश आहे. कोणत्या पक्षाचे, संघटनेचे किंवा व्यक्तीचे यश नाही. हे आपण जगाला दाखवून दिले आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांनी व्यक्त केले.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, सेवा मित्र मंडळ, पुणे तर्फे प.पू. जगद्गुरू शंकराचार्य करवीर पीठ यांच्या शुभाशीर्वादाने ह.भ.प. डॉ. किसन महाराज साखरे गौरवार्थ पुणे कीर्तन महोत्सवाचे आयोजन लाल महाल येथे करण्यात आले आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर पुनर्निर्माणानिमित्त श्रीरामकथा होणार आहे. उदघाटनप्रसंगी आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, प्रा. संगीता मावळे आदी उपस्थित होते.
डॉ. प्रवीण दबडघाव म्हणाले, प्रभू रामचंद्र, छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श आहेत. त्यांच्याप्रमाणे आपण आपले जीवन व्यतित करायला हवे. तसेच श्रीराम मंदिर उभारणीच्या दिवशी घरोघरी गुढ्या उभारून रांगोळी काढून दिवाळी साजरी करावी.
आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, सन २०२४ मध्ये अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर उभारणीचे औचित्य साधून पुण्यात श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सलग पंधरा वर्षे हा उपक्रम सुरू आहे. पुण्यासह महाराष्ट्रातील विविध कीर्तनकारांनी महोत्सवात आपली सेवा दिली आहे. मंगळवार, दिनांक ५ डिसेंबर पर्यंत दररोज सायंकाळी ६ वाजता होणारा हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी कीर्तनकार ह.भ.प. उद्धव बुवा जावडेकर यांचे कीर्तन झाले. त्यांना होनराज मावळे (पेटी), मिलिंद तायवाडे (तबला) यांनी साथसंगत केली. अरुणकुमार बाभुळगावकर, ओंकार चिकणे, मंगलमूर्ती औरंगाबादकर यांनी आयोजनात सहभाग घेतला. अक्षदा इनामदार हिने सूत्रसंचालन केले.
प्रभू श्रीराम मंदिर उभारणी हे हिंदू समाज संघटित झाल्याचे यश- डॉ. प्रवीण दबडघाव
Date:

