सामाजिक कार्यकर्ते सुभाष चुत्तर यांचे मत ः विद्या महामंडळ संस्थेचा ६२ व्या वर्धापनदिनानिमित्त पु. ग. वैद्य स्मृती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
पुणे ः आज समाजात विशेष मुले दिसली की त्यांना मदत करण्याच्या हेतूने दया दाखवली जाते. त्यांना सतत काही तरी शिकविले जाते. त्यांना शिकवण्यापेक्षा त्यांना समजून घेतले पाहिजे. त्यांच्यात अनेक गुण असतात. अनेकजण उच्च शिक्षण देखील घेत आहेत. त्यांना दया आणि सहानुभूती देण्याची नाही तर नोकरी देणे गरजेचे आहे. प्रत्येक कंपनीमध्ये विशेष व्यक्तींसाठी नोकरीची जागा राखीव असली पाहिजे. त्यांच्या इतके चोख काम कोणी करू शकत नाही, असे मत व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते सुभाष चुत्तर यांनी व्यक्त केले.
विद्या महामंडळ संस्थेच्या ६२ व्या वर्धापनदिनी व ‘लोकशिक्षण दिनानिमित्त’पु. ग. वैद्य स्मृती पुरस्कार’ प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी आपटे प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी खुशबू जयंतीलाल परिहारिया यांना सुभाष चुत्तर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. आपटे रस्त्यावरील संस्थेच्या सभागृहात सोहळा संपन्न झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राम रानडे, कार्याध्यक्ष अमोल साने, कार्यवाह लिलाधर गाजरे, संस्थेच्या उपाध्यक्षा अपर्णा कुलकर्णी, अॅड. अभय आपटे, खुशबुच्या आई उषा परिहारिया आदी मान्यवर उपस्थित होते. मानचिन्ह, मानपत्र, पुष्पगुच्छ रोख रक्कम अकरा हजार असे पुरस्काराचे स्वरूप होते.
राम रानडे म्हणाले, विशेष मुलांना काही शिकवण्याची गरज नसते. त्यांच्याकडूनच आपण अनेक गोष्टी शिकत असतो. त्यांना समाजातील वेगळा भाग म्हणून बघण्यापेक्षा मानाचे स्थान दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
अभय आपटे म्हणाले, तुम्ही आज कोणत्या स्थानावर आहात यापेक्षा तुम्ही तिथे कसे पोहोचले आणि तो प्रवास कसा होता हे जास्त महत्वाचे आहे. खुशबुचा प्रवासपण तितकाच महत्वाचा आहे म्हणून तिचे कौतुक वाटते. अशा व्यक्तींना मुलांसमोर आणले पाहिजे. आज विद्यार्थ्यासमोर आदर्शच नाहीत. खुशबु सारख्या व्यक्तींचे समाजातील स्थान आणि त्यांचा प्रवास हा विद्यार्थ्यांसाठी आदर्श आहे, असे त्यांनी सांगितले. खुशबु परिहारीया यांच्या आई उषा परिहारिया यांनी खुशबुच्या शाळेतील बालपणीच्या आठवणी सांगितल्या.
सुमेधा जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. अमोल साने यांनी प्रास्ताविक केले आणि गौतम मगरे यांनी आभार मानले.

