उरण, कर्जत, खालापूर, खोपोलीत भागात बारणे यांची प्रचार फेरी

Date:

खोपोली, दि. 5 मे – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी शनिवारी उरण, कर्जत, खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागात काही गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला. रात्री खोपोली शहरात काढण्यात आलेल्या प्रचार फेरीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कर्जत-खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे, उरणचे आमदार महेश बालदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय म्हसुरकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी ठिकठिकाणी प्रचार फेरीत सहभागी झाले होते.

खासदार बारणे यांनी उरण खालापूर विधानसभेतील वावर्ले, बोरगाव, कोयना, भिलवले, वेणेगाव, कलोते, चौक फाटा, चौक शहर, तुपगाव, लोहोप, माझगाव, वाणीवली, तळवळी, मोहपाडा आदी गावांमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मंडळी व महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या.

खोपोली शहरात संध्याकाळी प्रचार फेरी व बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचार फेरीला सुरुवात झाली.‌ बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने युवक-युवती सहभागी झाल्या होत्या. शहराच्या विविध भागांमध्ये फटाके वाजवून व औक्षण करून बारणे यांचे स्वागत करण्यात आले. खोपोली व्यापारी संघटनेच्या वतीने आयोजित सभेत बारणे यांना एकमुखी पाठिंबा जाहीर करण्यात आला.

विविध संस्था व संघटनांचा खासदार बारणे यांना पाठिंबा

थेरगाव, दि. 5 मे – विविध संस्था, संघटना व राजकीय पक्षांनी लेखी पत्रांद्वारे मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाज – पिंपरी चिंचवड शहर, सोमवंशीय क्षत्रिय कासार समाज सेवा मंडळ, निवृत्त कर्मचारी समन्वय समिती व लोककल्याण संस्था, स्वराज्य सेना, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, राष्ट्रीय बंजारा परिषद, संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटना, पिंपरी- चिंचवड वडार समाज सेवा संघ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) आदी संघटनांनी बारणे यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे.

अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाज पिंपरी- चिंचवड शहरच्या वतीने बारणे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. लाडशाखीय वाणी समाज हा पिंपरी-चिंचवड शहर, मावळ तालुका व पनवेल शहरात मोठ्या प्रमाणावर विस्तारलेला असून पिंपरी-चिंचवड शहरात जवळपास 20 हजार मतदार या समाजाचे कायम स्वरूपी रहिवासी आहेत. समाज हा मुख्यत्वे व्यवसाय करणारा असल्याने शहरातील इतर सर्व समाज घटकांशी कायम संपर्कात आहे. त्यामुळेच निवडणुकीच्या दृष्टीने लाडशाखीय वाणी समाजाचे महत्व अधिक आहे. वाणी समाजाची नवीन पिढी देखील व्यापार, डॉक्टर्स, वकील, चार्टर्ड अकौंटंट, आर्किटेक्ट, आयटी या व्यवसायांमध्ये कार्यरत असून या पिढीच्या विचारसरणीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याची छाप पडली आहे. त्यामुळेच सर्व समाजाने एकत्र येवून पंतप्रधान मोदी आणि शिवसेनेचे मावळ लोकसभेचे उमेदवार खासदार बारणे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

या प्रसंगी समाजाचे प्रतिनिधी विजय शिनकर, प्रा. डॉ. दीपक येवले, मनोज ब्राह्मणकर, युवा प्रतिनिधी प्रशांत ब्राह्मणकर, मयूर गहिवड आदी मान्यवर उपस्थित होते.

आरपीआय गवई गटाचा पाठिंबा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (गवई गट) पिंपरी- चिंचवड शहराध्यक्ष बबन साके, महिला अध्यक्ष रेश्माताई पारधे, युवक अध्यक्ष सागर माने यांनी बारणे यांना पाठिंबा दिला आहे. आमचा पक्ष महाविकास आघाडीत सहभागी असतानाही आम्हाला निवडणूक प्रक्रियेत सामावून घेतलेले नाही. या अपमानाचा बदला घेण्यासाठी आम्ही महायुतीचे उमेदवार बारणे यांच्या प्रचारात सहभागी होऊन त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार आहोत, असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

वडार समाज सेवा संघाचे पाठिंबा पत्र

पिंपरी चिंचवड वडार सेवा समाज संघाच्या वतीने अध्यक्ष पांडुरंग भांडेकर, कार्याध्यक्ष हरिश्चंद्र लष्करे, सचिव सोमनाथ दंडवते आदींनी बारणे यांना पाठिंबा दिला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये रामनगर, गांधीनगर, खराळवाडी, आनंदनगर, इंदिरानगर, कासारवाडी, फुगेवाडी, पिंपळे गुरव, काळा खडक या भागात वडार समाजाचे दहा ते बारा हजार मतदार असून समजाने बारणे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय एकमुखाने घेतला आहे, असे संघटनेच्या पत्रकात म्हटले आहे.

सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजाचा पाठिंबा

सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजसेवा मंडळाचे पिंपरी चिंचवड शहर अधक्ष दिलीप रासने यांनी पाठिंबा पत्र दिले आहे.

निवृत्त कर्मचारी समन्वय समिती व लोककल्याण संस्था राष्ट्रीय संघर्ष समिती मावळच्या वतीने अध्यक्ष शंकरराव शेवकर, दशरथ आप्पा ढोरे, सचिव राजाराम नाटक, प्रसिद्धी प्रमुख सुदेश गिरमे, प्रभाकर कुलकर्णी व अन्य पदाधिकाऱ्यांनी बारणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

स्वराज्य सेना, महाराष्ट्र या पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत सूर्यवंशी, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विशाल सावंत, महिला अध्यक्ष ज्योती वाघस्कर, पिंपरी चिंचवड संघटक राम भद्रपे यांनी पाठिंबा पत्र दिले आहे. स्वराज्य सेना पक्षाच्या जाहीरनाम्यातील सर्व मुद्दे बारणे यांना मान्य असल्यामुळे पाठिंब्याचा निर्णय घेण्यात आला, असे पत्रकात म्हटले आहे.

महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा पाठिंबा

महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा प्रचार करण्यात येत आहे त्यामुळे मावळ मतदारसंघात बारणे यांना पाठिंबा देण्यात आला आहे. पत्रावर प्रांत उपाध्यक्ष रंगनाथ पंडित, प्रांत कोषाध्यक्ष सुभाष नाना निढाळकर, प्रांत सहसचिव नंदकुमार कारले, प्रांत प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब राऊत तसेच सोमनाथ पंडित, शिवाजीराव लोखंडे, साहेबलाल शर्मा, राहुल साळुंखे, रशीद शेख, सुवर्णाताई रायकर या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

राष्ट्रीय बंजारा परिषद मोदींच्या पाठीशी

राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने राष्ट्रीय महासचिव ॲड. पंडित राठोड यांनी बारणे यांना पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हिंदू राष्ट्र संकल्पनेमुळे गोरबंजारा समाज प्रभावित व उत्साहित असून पंतप्रधान मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत, असे ॲड. राठोड यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय कार्याध्यक्ष अनिल नाईक, प्रदेश उपाध्यक्ष प्रेमकिसन राठोड तसेच अमोल पवार, रावसाहेब चव्हाण, सुबोध पवार, नानाभाऊ राठोड आदींच्या पाठिंबा पत्रावर सही आहे.

संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनेचे पाठिंबा पत्र

संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनेच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निर्गुण कांबळे यांनी खासदार बारणे यांना पाठिंबाचे पत्र दिले आहे. सब का साथ, सब का विकास, हा मूलमंत्र घेऊन देशात विकासाची गंगा आणणारे उच्चपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी तसेच बारणे यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामांची पोचपावती म्हणून सर्वांनी बारणे यांना मतदान करावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्राजक्ता पटवर्धन यांना भाऊसाहेब स्मृती पाटणकर स्मृती पुरस्कार

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे रविवारी गौरव पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे मराठीतील आद्य...

अडचणींना सामोरे जात फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घ्या : गजाला शेख

गजाला शेख लिखित ‘द फिनिक्स पाथ’ पुस्तकाचे प्रकाशन पुणे :...

शशिकांत सुतारांच्या पुत्राने ठाकरेंना दिला मोठा हादरा, संजय भोसलेंसह भाजपात केला प्रवेश

मुरलीधर मोहोळ,गणेश बिडकर,श्रीनाथ भिमाले यांची विरोधकांची बलस्थाने काबीज करणारी...

प्रशांत जगताप स्वार्थी: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुभाष जगताप म्हणाले…

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार , प्रशांत जगताप यांनी...