पुणे,दि. ३ : जिल्ह्यात मतदार जागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येत असून शहरी भागातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी गृहनिर्माण संस्थांचा सहभाग आवश्यक आहे. गृहनिर्माण संस्थांमध्ये पदाधिकारी आणि सदस्यांनी जास्तीत जास्त मतदार जागृती करावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, स्वीप समन्वयक अधिकारी अर्चना तांबे, सहकारी गृहनिर्माण संस्था पुणे शहर जिल्हा उपनिबंधक व जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) प्रकाश जगताप, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन तसेच पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. दिवसे म्हणाले, जिल्ह्यात गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटचे प्रमाण अधिक असून तेथील मतदारांची संख्या अधिक आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदान होण्याच्यादृष्टीने ३५ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मतदारांना मतदान केंद्राची माहिती होण्यासाठी तयार करण्यात आलेला क्यूआर कोड संस्थेच्या दर्शनी भागात लावण्यात यावा. मतदार ओळख पत्र आणि मतदार ओळख चिठ्ठी देण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे. सहकारी गृहनिर्माण संस्था आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी समन्वय ठेऊन जास्तीत जास्त गृहनिर्माण संस्थामध्ये मतदान होईल यासाठी प्रयत्न करावेत.
मतदारांच्या सुविधेसाठी ‘नो युवर पोलींग स्टेशन’ उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच मतदारांना हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. लवकरच मतदान केंद्रांची माहिती देण्यासाठी मोबाईल ॲपची सुविधा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. नगरपालिका क्षेत्रातही स्थानिक यंत्रणेमार्फत मतदान वाढीसाठी प्रयत्न करावेत. मतदार नोंदणी झालेल्या जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहनही डॉ. दिवसे यांनी केले.

