पुणे : नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणारे पुणे शहर काँग्रेसचे नेते, माजी उपमहापौर आबा बागूल यांची नाराजी दूर झाली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी त्यांच्या आदेशांनुसार बागूल यांची प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बागूल हे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय झाल्याने अंतर्गत वादाचा एक अंक संपल्याची चर्चा काँग्रेस वर्तुळात आहे.त्यांनी काँग्रेस भवनाच्या दारात केलेल्या आंदोलनानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पुण्यात अचानक घेतलेल्या बैठकीलाही ते अनुपस्थित होते. या वेळी बागूल यांची समजूत काढा, अशी सूचना थोरात यांनी केली होती. त्यानंतरही बागूल यांच्याशी कोणीही संपर्क साधला नसल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी नागपुरात फडणवीस यांची भेट घेतल्याची कुजबूज होती, तर आबा बागूल पक्ष सोडणार नाहीत. त्यांनी व्यक्तिगत कामासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असावी, अशी शक्यता शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी व्यक्त केली होती.या सर्व घडामोडी सुरू असताना थोरात यांनी त्यांच्या पुढील भेटीदरम्यान बागूल यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली होती. काँग्रेसचे उमेदवार धंगेकर हे दोन दिवसांपूर्वी बागूल यांच्या निवासस्थानी गेले होते. त्या वेळी त्यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसकडून बागूल यांची काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आबा बागूल यांची कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती
Date:

