पुणे: निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय स्तरावर नियुक्त निवडणूक खर्च विषयक कक्षातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी विहित नमुन्यातील नोंदी तसेच उमेदवारांनी दिलेल्या खर्चाच्या माहितीच्या नोंदींची पडताळणी करावी आणि नोंदवह्या काटेकोरपणे अद्ययावत ठेवाव्यात, असे निर्देश मावळ लोकसभा विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक सुधांशू राय यांनी दिले.
मावळ लोकसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक श्री. राय यांनी आकुर्डी पुणे येथील पीएमआरडीए प्रशासकीय भवनातील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देवून कामकाजाची माहिती घेतली, त्यावेळी राय बोलत होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये स्थापित करण्यात आलेल्या विविध कक्षांची माहिती दिली. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले, समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे, हिम्मत खराडे आदी उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक खर्च संनियत्रण यावरील अनुदेशांचा सारसंग्रह मधील लेख्यांची तपासणी या तरतूदीनुसार उमेदवाराने ठेवलेल्या दैंनदिन खर्च विषयक लेख्यांची तपासणी करण्यात येत असते. त्या अनुषंगाने श्री. राय यांनी निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेवून विविध निर्देश दिले. निवडणूक खर्चाची नोंद योग्य पद्धतीने घेवून प्रत्येक नोंदी अद्ययावत ठेवाव्या, बँकांकडून प्राप्त झालेल्या तपशीलाची माहिती संकलीत करावी, विविध भरारी पथके सातत्याने कार्यान्वीत ठेवून प्रत्येक बाबीची बारकाईने तपासणी करावी, अशा सूचना राय यांनी यावेळी दिल्या.
श्री. राय यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील माध्यम कक्ष, एक खिडकी कक्ष, आचार संहिता कक्ष, निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्ष, कायदा व सुव्यवस्था कक्ष, टपाली मतदान कक्ष अशा विविध कक्षामध्ये प्रत्यक्ष भेट देवून येथील कामकाजाची माहिती घेतली.
यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या निवडणूक खर्च तपासणी पथक प्रमुख अश्विनी मुसळे, निवडणूक निरीक्षक समन्वय कक्षाचे प्रमुख प्रमोद ओभासे, समन्वय सुरेंद्र देशमुखे, सचिन चाटे आदी उपस्थित होते.