पुणे,दि.७: पुणे लोकसभा मतदार संघाअंतर्गत शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर नियुक्त ३ हजार २७५ अधिकारी,कर्मचाऱ्यांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅट हाताळणीबाबत शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रशिक्षण
देण्यात आले.
यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गीते, नायब तहसीलदार सायली धस, मनुष्यबळ व प्रशिक्षण नोडल अधिकारी गजानन देशमुख उपस्थित होते.
दोन दिवसीय प्रशिक्षण सत्राच्या पहिल्या दिवशी मार्गदर्शन करताना श्री. गीते यांनी निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली. भारतीय लोकशाहीचे घटक असल्याची भावना मनात ठेवून प्रत्येकाने कर्तव्यात आपापली जबाबदारी पार पाडावी, मतदानाचे दिवशी मतदान अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत असताना भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रशिक्षणार्थींना सुलभ संदर्भासाठी मतदान केंद्राध्यक्ष मार्गदर्शिकांचे वितरण करण्यात आले. उपस्थितांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या हाताळणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या शंकांचे श्री. गीते यांनी यावेळी निरसन केले.

