थेऊर – खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा आज हवेली तालुक्यातील दौरा अष्टविनायक पैकी एक असलेल्या श्री क्षेत्र थेऊर येथील “बाप्पा चिंतामणीच्या” चरणाशी लीन होऊन सुरुवात झाला. यावेळी श्री क्षेत्र थेऊरच्या ग्रामस्थांनी जंगी स्वागत करत वाजत गाजत मिरवणूक काढली. दरम्यान डॉ. कोल्हे यांच्या हस्ते बाप्पा चिंतामणीची आरती करण्यात आली. थेऊर येथून सुरू झालेला गाव भेट दौरा सायंकाळी उशिरा उरुळी कांचन परिसरात समारोप करण्यात आला.
यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी टिळेकरवाडी (ता. हवेली) येथे बोलताना डॉ. कोल्हे यांनी भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारवर निशाणा साधला ते म्हणाले की, अब की बार भाजपा हद्दपार केल्याशिवाय शेतकऱ्यांना सुखाचे दिवस येणार नाही. या शेतकरी विरोधी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याची जबाबदारी आता आपल्या मायबाप जनतेत आहे. भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांना जर चांगले दिवस हवे असतील तर या भाजप सरकारला हद्दपार करणे गरजेचे आहे. भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या इतर पक्षांना मतदान करण्यापूर्वी या देशातील शेतकरी नक्कीच विचार करेल.
दरम्यान शिरुर लोकसभा मतदारसंघातील या शेतकऱ्याच्या पोराला घेरण्यासाठी राज्यातील मोठे मोठे नेते मतदारसंघात येतात परंतु माझा मायबाप जनतेवर विश्वास असल्याच्या भावना यावेळी बोलताना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केल्या. दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, विरोधकांकडे इतर मुद्दे नसल्याने खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचा प्रकार सुरू आहे. स्वतः ज्यांना तीन टर्म या जनतेने आशिर्वाद दिले, निधी खर्च हा ज्या मंजुऱ्या आणि प्र.मा. असतात त्या मोजल्या जात नाही. कोरोना काळात खासदार निधी मिळत नव्हता, त्यावेळेच्या बातम्या काढून शिळ्या कढीला ऊत आणण्याचा हा प्रकार आहे. संपूर्ण खासदार निधी खर्च करून वर तीन कोटींचा प्रस्ताव आहे. मी विरोधी खासदार असूनही खासदार निधी केवळ पाच कोटी असताना तरीही साडे एकोणीस हजार कोटी रुपये निधी मतदारसंघात आणू शकल्यामुळे हे सांगताना विरोधकांची अडचण होते म्हणून खोटं बोल पण रेटून बोल असा प्रकार सुरू आहे.
खासदार डॉ. कोल्हे गावात किती वेळा आले याची यादीच दिली सरपंचांनी.
पेठगाव (ता. हवेली) येथील माजीआदर्श सरपंच महादेव चौधरी यांनी खासदार डॉ. कोल्हे गेल्या पाच वर्षांत गावात कितीवेळा आले याची यादीच विरोधकांच्या माहितीसाठी जाहीर केली. ही यादी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे सुपूर्द करत गावकऱ्यांना याची माहिती दिली. यावेळी डॉ. कोल्हे यांनी ही यादी हातात घेऊन आपण कितीवेळा या पेठगाव याठिकाणी आलो याची संपूर्ण माहिती सांगितली, याशिवाय गावामध्ये काय काय विकासकामे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून झाली किंवा मंजूर आहे याची देखील यादी या सरपंचांनी दिली.यावेळी आमदार अशोक पवार, संदीप गोते, जगदीश महाडिक, पांडुरंग काळे, सोनबा चौधरी, बाजीराव भालसिंग, भारती शेवाळे, सुरेखा बोर्डे, सुभाष टिळेकर, प्रदीप वसंत कंद, गणेश पुजारी, संदेश आव्हाळे, सोमनाथ गायकवाड आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

