पुणे : श्री वखारिया महाजन पंच संस्थेला १७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त समाजातील बांधवासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन दादावाडी येथील अहिंसा भवन येथे करण्यात आले होते. यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
यावेळी रवींद्र शहा व पदाधिकारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पहिली ते बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना मेरिट शिल्ड देण्यात आले, तसेच ग्रॅज्युएशन व पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत सर्व शाखेतील विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमात जैन उपवास तपश्चर्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. समाजातील बांधवांना रुग्णालयात ऍडमिट करणे तसेच एखादे ऑपरेशन कमीत कमी खर्चात कसे करता येईल, याचे मार्गदर्शन संस्थेचे डॉ.धर्मेंद्र शहा यांनी केले. सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला.
कमलेश मोतीवाले यांनी पीपीटी द्वारे वार्षिक कार्यक्रमाची माहिती दिली. त्यामध्ये रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर व रक्त तपासणी, कॅन्सर तपासणी शिबिर घेण्यात आल्याचे सांगितले. विकलांग लोकांना पाय व हात मोफत देण्यात आले. समाजातील गरजू रुग्णांना आर्थिक मदत देखील संस्थेतर्फे देण्यात येते. वृक्षारोपण करण्यात आल्याची माहिती दिली. सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम घेण्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. रविन्द्र शाह यांनी शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचालीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे नियोजन कार्यकारिणी समिती ने केले. त्यामध्ये कमलेश मोतिवाले, सुनिल परिख, दिपक शहा, ॲड.महेन्द्र शहा, परेश अ.शहा, अभिजित शहा, अतुल शहा, सुहास शहा, प्रकाश शाह, डॉ राजेश दोशी, राजेंद्र शहा, आशिष शहा, राहुल शहा, अंकुर परिख, राजेश शहा, मयुर गांधी, डॉ धर्मेंद्र शाह, हितेंद्र शहा, ॲड.मितेश शहा, भावेश शहा, परेश ची.शाह हे होते.
परेश अ.शहा यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

