पुणे: अजित पवारांमुळे शरद पवारांना अखेर रायगडावर जावं लागलं. आता तुतारी कुठे आणि किती वाजते हे येणाऱ्या काळात दिसेल, असा उपरोधित टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना लगावला.
देवेंद्र फडणवीस आज पुण्यात. महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’ ला ते भेट देण्यासाठी आले. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुण्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्स साठा सापडला. या कामगिरीसाठी पुणे पोलिसांचं विशेष अभिनंदन त्यांनी केले. त्यासोबतच त्यांनी शरद पवारांच्या रायगडावरील चिन्हाच्या लॉंचिंगच्या कार्यक्रमावर देखील टोला लगावला.
शरद पवार गटाच्या चिन्ह लॉचिंगवर पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले की, मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की शेवटी 40 वर्षानंतर का होईना पण पवार साहेब शेवटी रायगडावर गेले. अजित दादांना एका गोष्टीचा तर क्रेडिट द्यावाच लागेल की शेवटी छत्रपती शिवरायांच्या चरणी 40 वर्षानंतर अजितदादांमुळे शरद पवारांना रायगडावर जावं लागलं. आता तुतारी कुठे वाजते कशी वाजते ते आपल्याला भविष्यात देखील दिसेलच, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, जागा वाटपासंदर्भात आमची एक बैठक झालेली आहे. ती समाधानकारक झाली आहे. या संदर्भात आणखी एक बैठक आम्ही करू आणि लवकरच आम्ही जागावाटप करू. राहुल नार्वेकर असतील किंवा इतर कोणी यांच्या चर्चेवर नाव निश्चित होत नसतात. यामागे एक प्रोसेस असते. ती प्रोसेस पूर्ण झाल्यावर ज्यांची नावे पुढे येतील ती निश्चित तुम्हाला सांगण्यात येईल.

