जे काम बंदूक आणि मिसाईल करु शकत नाही ते काम ड्रग्ज करत आहे

पुणे-पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने विश्रांतवाडी, कुरकुंभ आणि दिल्लीत छापा टाकून तब्बल 3 हजार 600 कोटी रुपये किंमतीचे 1700 किलो ड्रग्स जप्त केले आहे. पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक करुन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांना 25 लाखांचे पारितोषीक जाहीर केले आहे. तसेच पुणे पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी केलेली कारवाई ही नजकीच्या काळातील देशातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे पोलीस आयुक्तालयात पोलिसांचा सत्कार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी , पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त प्रविण पवार, अप्पर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, अरविंद चावरिया, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, संदीपसिंग गिल, आर.राजा, संभाजी कदम, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, सुनिल तांबे यांच्यासह इतर पोलिस अधिकारी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे,पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद, अनिता हिवरकर, विनायक गायकवाड, राजेंद्र लांडगे, अजय वाघमारे आणि पोलिस हवालदार विठ्ठल साळुंके यांचा सत्कार केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुणे पोलिसांचे हार्दिक अभिनंदन करतो. पुणे पोलिसांनी एक प्रचंड मोठी कारवाई अंमली पदार्थ विरोधात केली आहे. नजीकच्या काळातील ही देशातील सर्वात मोठी कारवाई आहे. जवळपास तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा एमडीचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. मागिल काही महिन्यापासून सातत्याने ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ ही मोहिम राबवली जात आहे. ‘ड्रग्ज फ्री इंडिया’ची मोहिम देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात देशात राबवली जात आहे. ड्रग्जच्या संदर्भात झिरो टॉलरन्स अवलंबला जात आहे. ड्रग्ज समाजाला उद्धवस्त करण्याचं काम करत आहे. जे काम बंदूक आणि मिसाईल करु शकत नाही ते काम ड्रग्ज करत आहे, म्हणून हे नष्ट करायचे असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, हा साठा जर पोहोचला असता, तर किती घरे उद्ध्वस्त झाली असती. कारखाने टाकून एमडी ड्रग्ज बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातून पैशांची देवाण-घेवाण सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे ही जी कारवाई झाली ती महत्त्वाची आहे. आपल्या समोर काय आव्हान आहेत ते लक्षात घेऊन आपल्याला काम करावे लागेल. या कारवाईमधून खूप काही शिकवलं आहे. आता अशाच लिंक शोधा असे आवाहन त्यांनी पुणे पोलिसांना केले. याचे रुट शोधणे महत्त्वाचं असल्याचे फडणवीस म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सगळ्या राज्यांना एकत्रित सूचना दिल्या आहेत आणि मदत करण्याचं आवाहन केलं आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.आपल्या समोर काय आव्हानं आहे हे लक्षात घेतले पाहिजे. हि कारवाई करुन थांबता येणार नाही.
अशा प्रकारचा छोटाही साठा मिळाला तरी बॅकवर्ड लिंक आणि फॉरवर्ड लिंकेज हे शोधून काढणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
ते पुणे पोलिसांनी केलं म्हणून ऐवढ्या मोठ्या प्रमाणात साठा मिळाला. नाहितर एक गुन्हेगार सापडला तर त्या आनंदात त्याच्या पुढे गेलो नसतो तर कदाचीत हे कधीच शक्य झाले नसते. ड्रग्ज पेडलर पकडलेच पाहिजेत. परंतु त्यांच्याकडे हे ड्रग्ज कुठून आले, कसं येतं, त्याचा रुट काय आहे, हे कुठे तयार होते हे शोधून काढणं अत्यंत महत्वाचे आहे, असे फडणवीस म्हणाले.या प्रकरणाचे धागेदोरे परदेशात आहेत. परदेशात काही प्रमाणात ड्रग्ज पाठवण्यात आला आहे.
त्यामुळे कॉर्डिनेशन असणे आवश्यक आहे. नवीन ज्या पद्धती आहेत, कुरिअरचा वापर करणे, डार्कनेटचा वापर करणं,
सोशल मीडिया साईटचा वापर करणं, त्याठिकाणी कॉन्टिटी छोटी असल्याने पकडणं कठीण आहे.
अशा या जागा शोधून काढाव्या लागतील आणि त्या ठिकाणी कारवाई करावी लागेल.
पुणे पोलीस आणि महाराष्ट्रातील युनिट्स यामध्ये चांगल्या प्रकारे काम करतील असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

