पुणे- बारामतीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं मोठं वजन आहे,अजितदादा स्वतः तिथे लीड घेतील,मागील लोकसभा निवडणुकीत खडकवासला भागात भाजपाला चांगले मताधिक्य मिळालं होतं. तर भोर, पुरंदर आणि दौंड मध्ये देखील भाजपा उमेदवाराला सुप्रिया सुळेंपेक्षा अधिक मतं मिळाली होती.तरुण मतदारांचे आकर्षण अजित पवार आहेत. इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील या दोन नेत्यांचा प्रभाव आहे. हे दोन्ही नेते आता आमच्याबरोबर आहेत. ते लोकसभेला काम करतील. बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वच मोठे नेते आमच्याबरोबर आहेत. केवळ काँग्रेसचे संजय जगताप, संग्राम थोपटे आणि स्वतः सुप्रिया सुळे हे तीनच नेते महाविकास आघाडी कडे आहेत. यामुळे बारामती मतदार संघातून सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांचा पराभव करतील असे मत माजी खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केले आहे.
संजय काकडे म्हणाले,अजित पवारांसह त्यांचे समर्थक आमदार राहुल कुल, आमदार दत्तात्रय भरणे यांची मतं देखील सुनेत्रा पवार यांना मिळतील. त्यामुळे अजित पवार ज्याला उमेदवारी देतील तोच उमेदवार जिंकेल असं आत्ता तरी वाटतंय. यासह भाजपाची चार लाख पारंपरिक मतं अजित पवारांच्या उमेदवाराला मिळतील. अजित पवारांची स्वतःची तीन ते साडेतीन लाख मतं आहेत. पुरंदरचे संजय जगताप, विजय शिवतारे यांची मतंदेखील आमच्याकडे आहेत. या सर्वांचा विचार केला तर बारामतीत सुनेत्रा पवारांचे पारडं जड आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय व्यासपीठांवर दिसू लागल्या आहेत. दुसऱ्या बाजूला उपमुख्यमत्री अजित पवार हे सातत्याने बारामतीत सभा, बैठका, कार्यक्रम घेत आहेत. बारामतीतल्या लहान – मोठ्या राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत.अजित पवार हे आगामी निवडणुकीत बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंविरोधात मोर्चेबांधणी करत आहेत. सुनेत्रा पवार यांना लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी तर्फे निवडणूक लढवतील असे सध्या वातावरण दिसते आहे.सुनेत्रा पवार यांनी लोकसभा लढवावी अशी बारामती मतदारसंघातून, जनतेमधून आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमधून मागणी होत आहे असे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांनी आपले मत व्यक्त केलं आहे.
काकडे म्हणाले, महायुतीतली नेत्यांची फळी पाहिली तर लक्षात येईल की, सुनेत्रा पवार मोठ्या मताधिक्याने बारामती लोकसभा निवडणूक जिंकतील. त्यांच्यासाठी वातावरण खूप चांगलं आहे. त्याच्या जोडीला अजित पवारांनी मतदारसंघात केलेलं कामही आहे. आमच्या पक्षाचा पारंपरिक मतदार अजित पवारांबरोबर आहे. त्यामुळे मागच्या निवडणुकीत भाजपा उमेदवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात जो फरक होता तो तोडून सुनेत्रा पवार आघाडी घेतील. उदाहरण म्हणून २०१४ च्या निवडणुकीकडे पाहता येईल. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार महादेव जानकर ५७ हजार मतांनी पडले होते. २०१९ च्या निवडणुकीत सुप्रिया सुळे १.४७ लाख मतांनी निवडून आल्या होत्या.परंतु सुप्रिया सुळेंकडे जी लाख-दिड लाख मतं अधिक होती ती अजित पवारांमुळे त्यांना मिळाली होती.आता अजित पवार आमच्याबरोबर असल्याने युतीचं पारडं जड आहे.

