पुणे :पुणे पोलीस आयुक्तालयातील भरोसा सेलच्या सहायक पोलीस निरीक्षक अर्चना कटकेयांना बालकांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि महिला व बालविकास आयुक्तालय, युनिसेफ यांच्या वतीने ‘बाल स्नेही 2023’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग, मुंबई दिपक पाण्डेय, अध्यक्षा बाल हक्क संरक्षण आयोग अॅड. सुसीबेन शहा, बाल हक्क संरक्षण आयोगाचे सचिव शिवराज पाटील, महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे आयुक्त प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते मुंबईतील नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रदान करण्यात आला. यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते.
बालकांच्या सर्वांगीण विकास, बाल हक्क संरक्षण त्यांची सुरक्षा, आरोग्य इत्यादीसाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातून एकूण 716 विधीसंघर्षित बालकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. तर 2023 मध्ये 29 पीडितांना मनोधैर्य योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. पोलीस आयुक्तालयामार्फत पोक्सो मधील पीडित बलके तसेच विधीसंघर्षग्रस्त बालकांना बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ, संस्थेत दाखल करणे किंवा त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी वाहने उपलब्ध करुन दिली आहेत.याशिवाय दोन अल्पवीन मुलांना नोकरीसाठी आवश्यक असलेले चारित्रय पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त करुन दिले आहे.
तसेच कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत पोलीस काका/दिदी या योजनेकरिता एक नोडल अधिकारी व अंमलदार, दामिनी मार्शल यांची नेमणूक केली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळा, कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थांना गुड टच बॅड टच, सायबरचे वाढते प्रमाण व गुन्हेगारी, व्यसनाधीनता, प्रेम-मैत्री-आकर्षण, पोक्सो गुन्ह्यांबाबत मार्गदर्शन केले आहे. पुणे शहर पोलीस व होप फॉर दी चिल्ड्रेन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस आयुक्ताल्यातील 32 पैकी 24 पोलीस ठाण्यात ‘बालस्नेही कक्ष’ तयार करण्यात आला आहे. यामध्ये मोलाचा कार्य केल्याने गुन्हे शाखेच्या विशेष बाल सुरक्षा पथक, भरोसा सेल सहायक पोलीस निरीक्षक अर्चना कटके यांना ‘बाल स्नेही 2023’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

