मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. दोन दिवसांपूर्वी जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हिंदुजा रुग्णालयात जोशी यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र आज पहाटे मनोहर जोशी यांनी अखेरचा श्वास घेतला
मनोहर जोशी हे मे २०२३ पासून आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त होते. त्यांना ब्रेन हॅमरेज झाला होता. त्यांना हिंदुजा हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. ते कोमात गेले होते. दरम्यान आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक हरवला.
मनोहर जोशी यांनी १९७० च्या दशकात शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून येऊन आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर ते १९७६ ते १९७७ या काळात मुंबईचे महापौरही होते.मनोहर जोशी यांनी १९९५-१९९९ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. यानंतर, अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांना २००२-०४ साठी लोकसभा अध्यक्ष बनवण्यात आले. मनोहर जोशी मुंबई सेंट्रल मतदारसंघातून लोकसभेचे खासदार झाले. राज्यसभेचे खासदार म्हणूनही त्यांनी सहा वर्षे काम केले.

