भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा मुंबई दौरा यशस्वी
मुंबई दिनांक २२ फेब्रुवारी २०२४
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा दोन दिवसीय मुंबई दौरा यशस्वीपणे पार पडला. गुरुवारी श्री.नड्डाजी यांच्या हस्ते गिरगाव चौपाटी येथील सेठ तुलसीदास किलाचंद उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिल्पाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘हिरोज ऑफ मुंबई’ कार्यक्रमांतर्गत मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणाऱ्या १८ विभूतींच्या अर्धाकृती पुतळ्यांचे अनावरणही यावेळी करण्यात आले. कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
येणाऱ्या काळात हे उद्यान हजारो पर्यटकांचे आकर्षण नक्कीच बनेल पण त्यासोबतच लाखो भारतीयांना प्रेरणा देणारा एक स्रोत म्हणून ओळखले जाईल असे मत भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी यावेळी व्यक्त केले. गिरगाव चौपाटी येथील किलाचंद गार्डनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, लता मंगेशकर, दादासाहेब फाळके, कुसुमाग्रज, होमी भाभा, जेआरडी टाटा, जगन्नाथ शंकर शेठ, अण्णाभाऊ साठे, बाळासाहेब ठाकरे, धीरूभाई अंबानी, रामनाथ गोयंका, सेठ मोती शाह, हुतात्मा बाबू गेन, अशोक कुमार जैन, कोळीबांधव, सचिन तेंडुलकर अशा विविध मान्यवरांच्या पुतळ्यांचा समावेश आहे.
यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार, मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, डॉ. मंजू लोढा यांच्यासह महापुरुषांचे वंशज देखील उपस्थित होते. दरम्यान दुपारी नवी मुंबईत भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत १००८ कुंडीय अश्वमेध गायत्री महायज्ञही संपन्न झाला.

