श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग ४० व्या वर्धापनदिनानिमित्त ब्रह्मोत्सव ; शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांची उपस्थिती
पुणे : श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ब्रह्मोत्सवात पुण्यातील ७ शाळांमधील ३५० गरजू विद्यार्थी व विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. शुक्रवार, दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता मंदिरात होणा-या कार्यक्रमाला पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी दिली.
उत्सवकाळात धार्मिक विधींबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमही मंदिरातर्फे राबविले जातात. यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मागील १० वर्षांपासून दिली जाते. यंदा हुजूरपागा मुलींची शाळा लक्ष्मी रस्ता, रेणुका स्वरुप मुलींची शाळा सदाशिव पेठ, विद्या विकास विद्यालय सहकारनगर, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रस्ता, मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर, अहिल्यादेवी मुलींची शाळा, सौ. विमलाबाई गरवारे हायस्कूल शाळेतील इयत्ता ५ वी ते १० वी च्या गरजू विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल.
प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल म्हणाले, राजस्थान डिडवाना येथील अनंत श्री विभुषित जगतगुरु रामानुचार्य झालरिया पीठाधीपती पूज्य श्री श्री १००८ स्वामीजी घनश्यामाचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव होत आहे. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता पालखी सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे. श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली व श्री विष्णू यांच्या उत्सवमूर्तींची पालखी प्रदक्षिणा मंदिर परिसरात होणार आहे. तर, सायंकाळी ७.३० वाजता पुष्पउत्सव म्हणजेच फुलांची होळी होणार आहे. सर्व कार्यक्रमांमध्ये पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे ३५० गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
Date:

