काजू प्रक्रिया उद्योगांना ‘एसजीएसटी’चा परतावा ५ मार्चपूर्वी द्या; ‘सीजीएसटी’ची अडीच टक्के रक्कमही तातडीने परत करावी-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Date:

मुंबई, दि. २१ :- कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा आणि काजू प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या माध्यमातून काजूबोंड रसावर प्रक्रिया करण्याकरिता ब्राझीलचे तंत्रज्ञान वापरण्यात यावे. त्यासाठी ब्राझील देशाबरोबर सामंजस्य करार करावा. काजू प्रक्रिया उद्योगांना राज्य वस्तू व सेवा कराचा परतावा ५ मार्चपूर्वी द्यावा आणि केंद्रीय वस्तू व सेवा कराची अडीच टक्के रक्कम देखील राज्य शासनातर्फे तातडीने परत करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात आज काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वंकष विकासाच्या धोरणातून काजू उद्योगाचा विकास साधण्याच्या अनुषंगाने बैठक झाली. बैठकीस पणनमंत्री अब्दुल सत्तार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, काजू उत्पादक विभागातील स्थानिक आमदार सर्वश्री प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, शेखर निकम, महाराष्ट्र कॅश्यू मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, राज्य कर आयुक्त आशिष शर्मा, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, काजू उत्पादकांना जीएसटीमध्ये सवलत देण्याबरोबरच काजू बोंडूपासून विविध उत्पादने तयार करण्यासाठी प्रक्रिया उद्योग उभारून काजू पिकाच्या सर्वंकष विकासाच्या धोरणातून काजू उत्पादकांचा विकास साधला जाईल. जीएसटी करप्रणालीमध्ये काजू बियांसाठी पाच टक्के व काजूगराला पाच टक्के असा दुहेरी कर लागला आहे. यापैकी राज्याचा २.५ टक्के कराचा परतावा मिळत असून ‘सीजीएसटी’च्या २.५ टक्के परताव्याची रक्कम देखील राज्य शासनामार्फत दिली जाईल. या अनुषंगाने उद्योग विभागामार्फत पाठविण्यात आलेल्या ३२ कोटींच्या प्रस्तावांपैकी २५ कोटींच्या प्रस्तावांना वित्त विभागाने मान्यता दिली असून शिल्लक १५० प्रस्तावांचा परतावा ५ मार्चपर्यंत देण्यात यावा. यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

कोकण आणि कोल्हापूर परिसरात काजूची मोठ्या प्रमाणात लागवड होत असून या परिसरात काजू बियांवर प्रक्रिया करणारे उद्योग कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त काजू बोंडूचे सुमारे २२ लाख मे.टन उत्पादन होत असून काजूच्या बोंडूंना विशिष्ट वास येत असल्याने ते प्रक्रिया न होता वाया जाते. ब्राझीलमध्ये यावर संशोधन होऊन अशा बोंडांचा वास घालवला जातो आणि त्यावर प्रक्रिया करून त्यापासून विविध उत्पादने तयार केली जातात. कोकणातील काजू बोंडांवर अशी प्रक्रिया करून उत्पादने तयार करण्यासाठी ब्राझीलसोबत करार करण्यात यावा. यासंदर्भात मंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर जिल्ह्यातील काजू उत्पादन क्षेत्रातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन याबाबतची कार्यवाही करावी. यासाठी काजू मंडळाचे कार्यालय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू संशोधन केंद्राच्या इमारतीत स्थापन करावे. यासाठी लागणारा निधी वित्त विभागामार्फत देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

कृषी विभागामार्फत कोकण विभाग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड व आजरा तालुक्यांमध्ये काजू फळपिक विकास योजना लागू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पणन विभागामार्फत काजू फळ पिकाच्या विकासाकरिता महाराष्ट्र राज्य काजू मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळामार्फत राज्याचा काजू ब्रँड तयार करणे, काजू प्रक्रिया आणि मूल्यवर्धनाबाबतच्या कार्यांना चालना देणे, उत्पादनांचे मार्केटिंग करणे आदी कामे करण्यात येत आहेत. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ठिबक सिंचन योजनेचा लाभ काजू उत्पादकांना मिळवून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...