मुंबई दि.२०: राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे दिनांक ७ डिसेंबर २०२३ ते २० डिसेंबर २०२३ या काळात संपन्न झाले. त्या दरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषद सभागृहात केलेल्या कामकाजाबाबतचा माहितीपर अहवाल आज मुंबई येथे विधान भवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. याप्रसंगी विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे, संसदीय कार्य मंत्री श्री चंद्रकांत पाटील, आमदार सर्वश्री भाई जगताप, जयंत पाटील, एकनाथ खडसे, प्रसाद लाड, रणजितसिंह मोहिते पाटील, शशिकांत शिंदे, विलास पोतनीस, कपिल पाटील, अनिल परब, भाई गिरकर, विधीमंडळ सचिव -१ जितेंद्र भोळे , सचिव – २ विलास आठवले उपस्थित होते.
या अहवालात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अधिवेशन काळात पीठासीन अधिकारी पदावरून दिलेले निर्देश, महत्वाच्या विषयावर आयोजित केलेल्या बैठका,अनेक राजकीय-सामाजिक विषयांसंदर्भात घेतलेले निर्णय, दिलेले महत्वपूर्ण योगदान, शैक्षणिक विभागातील विद्यापीठांचे विषय, आदिवासींच्या संदर्भातील प्रश्न, महिला अत्याचाराच्या घटनांची तातडीने नोंद घेऊन पीडितांना दिलासा देण्याचा प्रयत्न, सामाजिक हिताचे प्रश्न, राजकीय क्षेत्रातील विषय, शेतकऱ्यांचे दुष्काळ व अवकाळीमुळे झालेले नुकसान अशा विविध विषयांवर करण्यात आलेल्या कामांची माहिती या अहवालात देण्यात आली आहे.
लोकप्रतिनिधींनी केलेल्या कामाचा अहवाल जनता जनार्दनाला सादर करण्याची उल्लेखनीय परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. त्या परंपरेचे अनुसरण मी सातत्याने करीत आहे, याचा मला विशेष आनंद होत आहे, अशी भावना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केली.

