मुंबई, दि.१९: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विधानभवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी, विधीमंडळ सचिव-१ श्री जितेंद्र भोळे, मा. उपसभापती यांचे खाजगी सचिव श्री. रवींद्र खेबुडकर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की,
छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण जगाला, देशाला, राज्याला स्वराज्याची अस्मिता निर्माण केली. त्यांची दूरदृष्टी, त्यांचे विचार, त्यांचे नियोजन, त्यांची कुटनीती, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी वापरलेले डावपेच आणि त्याच बरोबरीने हिंदू धर्माच्या संदर्भामध्ये त्यांची अत्यंत प्रखर भूमिका ही आजही प्रेरणादायी आहे.
उद्या २० फेब्रुवारी रोजी महत्त्वाचे अधिवेशन होणार आहे आणि पुन्हा २६ फेब्रुवारी ते १ मार्च पर्यंत पुढचं अधिवेशन आहे. या अधिवेशनात राज्याला भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर चांगल्या प्रकारे तोडगा आणि उत्तर या विधिमंडळाचे इमारतीतून मिळण्याच्या दृष्टीने आशीर्वाद मिळावेत अशा प्रकारची प्रार्थना छत्रपती शिवाजी महाराजांकडे करून त्यांना कोटी कोटी वंदन अर्पण केले असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

