पुणे-पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट रस्त्यावर वाहनांची तोडफोड करून एका महिलेला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या हल्ल्यात वर्षा दयाराम गायकवाड ही महिला सुदैवाने बचावली आहे. परंतु, त्यांच्या दुचाकी आणि कार या गाडीचे नुकसान झाले आहे. ही घटना पुण्यातील चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खराडी परिसरात पार्किंगच्या वादातून झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी महेश राजे यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धिरज दिलीप सपाटे (वय 28, नं 1 लेन नं 1 तुकारामनगर खराडी), आकाश सोकीन सोदे (वय 23, रा चंदननगर), विशाल ससाने वय 20, रा. बीजेएस कॉलेज जवळ वाघोली) , नयत नितीन गायकवाड (वय १९, रा साईनाथनगर वडगाव) सुरज रविंद्र बोरुड़े (वय २३, रा उबाळेनगर), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. तर धिरज सपाटे हा फरार असून तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.
तक्रारदार महेश राजे व या प्रकरणातील आरोपी हे एकाच परीसरात राहण्यास आहे. त्यांच्यात मागील काही दिवसांपासून पार्किंग कारणातून वाद सुरू होते. 17 फेब्रुवारी रोजी हा वाद टोकाला गेला. यावेळी आरोपी आणि त्याच्या १३ साथीदारांनी दुचाकीवर येत तक्रारदार यांच्या कारच्या काचा लाकडी दांडक्याने फोडल्या. त्यानंतर आरोपीनी, त्यांच्या गाडीवर पेट्रोल टाकून आग लावली. पेट्रोल चारचाकी गाडीवर पडल्याने गाडीने तात्काळ पेट घेतला. यामध्ये कारच्या गाडीचे सीट जळले.
यावेळी तक्रारदार यांच्या भाडेकरू वर्षा गायकवाड या घराबाहेर आल्या असत्या आरोपींनी त्यांच्यावर देखील पेट्रोल टाकून त्यांना जिवंत पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या घरात पळून गेल्याने थोडक्यात बचावल्या. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सर्व आरोपींच्या हातात लाठ्या असल्याचे स्पष्ट दिसत आहे. काहींनी तोंडाला रुमाल बांधला होता. आरोपींनी महिलेच्या घरासमोर उभ्या असलेल्या गाडीच्या काचा देखील फोडल्या. यानंतर आरोपी हे फरार झाले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.

