पुणे : जय भवानी जय शिवाजी चा जयघोष… ढोल ताशा ंचा गजर… लाठी काठींचे मर्दानी खेळ… विद्यार्थ्यांच्या हातांमध्ये फडकणारे भगवे झेंडे अशा उत्साहपूर्ण वातावरणात बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन कार्यरत असणाऱ्या श्री शिवाजी मराठा सोसायटीमध्ये शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.
श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने शिवजयंती उत्सव आणि मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार पेठेतील सोसायटीच्या प्रांगणातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन मिरवणुकीला प्रारंभ झाला. सोसायटीचे मानद सचिव अण्णा थोरात, उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, नियामक मंडळ अध्यक्ष सत्येंद्र कांचन, कारभारी मंडळ अध्यक्ष विलास गव्हाणे, कमलताई व्यवहारे, शाखाप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी तब्बल १५०० पेक्षा अधिक विद्यार्थी पांरपारिक वेशात तसेच शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या वेशात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी पर्यावरण जागृती, राष्ट्रीय एकात्मता, स्वच्छ पुणे -स्वच्छ भारत संदेश मिरवणुकीत दिला. यावेळी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
श्री शिवाजी मराठा सोसायटी – बाजीराव रस्त्यामार्गे चितळे बंधू मिठाईवाले – महात्मा फुले मंडई – शिवाजी रोड मार्गे पुन्हा श्री शिवाजी मराठा सोसायटीमध्ये मिरवणूकीचा समारोप झाला. जिजाऊ आणि बाल शिवरायाची मूर्ती असलेला फुलांनी सजलेला रथ मिरवणुकीच्या अग्रभागी होता. मिरवणुकीत जयंत नगरकर यांचा नगारा, शिवगर्जना पथकाचे ढोल ताशा वादन आणि गंधर्व बँडचे वादन झाले.
अण्णा थोरात म्हणाले, श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी साहसी खेळ सादर केले. शिवरायांचे नेतृत्वगुण, त्यांचे शौर्य स्वराज्यासाठी त्यांनी केलेले कार्य विद्यार्थ्यांना कळावे आणि त्यांनी ते अंगिकारावे यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष सहभागातून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने भव्य शिवजयंती मिरवणूक-तब्बल १५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी मिरवणूकीत दिला स्वच्छ पुणेचा संदेश
Date:

