पुणे : देशाच्या ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी आजवर राष्ट्रनिर्मानामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली असून ग्रामीण , आदिवासी भागाच्या विकासासाठी व शिक्षीत, प्रगतशील व सशक्त भारत राष्ट्रनिर्मितीसाठी या विद्यार्थ्यांचे योगदान खूप महत्वाचे असल्याचे मत राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका श्रीमती व्ही शांताक्का यांनी व्यक्त केले.
निरगुडे (खानगाव), ता जुन्नर येथे सह्यसखा फौंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संशोधन आणि इंनोवेशन प्रयोगशाळा, गुरुजनांचा सन्मान आणि मिशन सह्याद्री प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी श्रीमती व्ही शांताक्का या प्रमुख उद्घाटक म्हणून बोलत होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून राष्ट्र सेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका श्रीमती प्रमिलाताई मेढे व राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख कार्यवाहिका श्रीमती चित्राताई जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी सह्यसखा फौंडेशनच्या विश्वस्त श्रीमती सुषमा इंगळे या होत्या.भारतासारख्या तरुणांच्या देशात राष्ट्रनिर्मानामध्ये हातभार लावणाऱ्या तरुणांची संख्या वाढणे आवशयक असून सह्यसखाचे संस्थापक अध्यक्ष अमित इंगळे यांच्यासारखे तरुण अभियात्रीकीचे शिक्षण घेऊन परदेशातील ऐशोआरामात चाललेले आयुष्य थांबवून राष्ट्रप्रेमापोटी , राष्ट्रसेवेसाठी मायदेशी परतून जुन्नरसारख्या आदिवासी भागामध्ये येऊन या परिसराचा कायापालट करण्यासाठी करीत असलेल्या कार्याची दखल घेत असे अनेक समाजहिताचे उपक्रम राबविण्यासाठी जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्र सेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका श्रीमती प्रमिलाताई मेढे यांनी केले.यंदाचे वर्ष हे युगपुरुष, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे तीनशे पन्नासावे वर्ष असून त्यानिमित्ताने जुन्नर येथे सह्यसखाच्या माध्यमातून शुभारंभ करण्यात आलेल्या सह्याद्री मिशन सह राबविण्यात येत असलेले इतर सर्व समाजोपयोगी उपक्रम हे स्तुत्य असून जुन्नर परिसरातील विद्यार्थी, शाळा व आदिवासी लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी सह्यसखा अगदी सख्यासारखा जनतेच्या पाठीसाठी उभे राहील अशी अपेक्षा राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख कार्यवाहिका श्रीमती चित्राताई जोशी यांनी व्यक्त केली.
यावेळी या तिन्ही मान्यवरांना सह्यसखाच्या वतीने त्यांच्या आयुष्यभराच्या राष्ट्रनिर्मितीमधील त्याग व योगदानासाठी विशेष मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच तिन्ही मान्यवरांच्या हस्ते प्रा अनिल पौल, प्रा चेतन दिवाण, प्रा महेश ठाकूर, प्रा प्रवीण पारगावकर, प्रा राजेश पाटील, प्रा आनंद गोरे, प्रा उज्वला कवडे, तसेच संत तुकाराम विद्यालय निरगुडेचे शिक्षकवृंद यां गुरुजनांचा सह्यसखाच्या योगदानाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.
संत तुकाराम विद्यालय निरगुडेमध्ये उद्गाटन करण्यात आलेल्या संशोधन व इनोव्हेशन प्रयोगशाळेची पाहणी श्रीमती प्रमिलाताई मेढे, श्रीमती व्ही शांताक्का व श्रीमती चित्राताई जोशी यांच्याकडून करण्यात आली व त्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सह्यसखा फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अमित इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रसाद कात्रे यांनी केले तर आभार सौ प्रीती इंगळे यांनी मानले.
कार्यक्रमास निरगुडे गावचे ग्रामस्थ, संत तुकाराम विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी तसेच सह्यसखा फौंडेशन चे सर्व विश्वस्त, स्वयंसेवक आदी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

