पुणे, दि. १७: मतदान टक्केवारीत वाढ होण्यासाठी सर्व पात्र नाव युवांची १०० टक्के मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पत्राद्वारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू तसेच सर्व महाविद्यालयांना केले आहे.
मतदार यादी हा लोकशाहीचा पाया असून तो सशक्त करण्यासाठी तसेच त्याची गुणवत्ता राखत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक म्हणून जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयामध्ये १०० टक्के मतदार नोंदणी करुन सर्वकष मतदार नोंदणी करुन मतदान प्रक्रियेतील नवयुवकांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
यासाठी सर्व पात्र विद्यार्थ्यांकडून आवश्यकतेप्रमाणे नवमतदार नोंदणीसाठी नमुना क्र. ६, नाव वागलणीसाठी नमुना क्र. ७ आणि मतदार यादीतील, मतदार कार्डवरील तपशील, नाव यात बदल, सुधारणा करण्यासाठी नमुना क्र. ८, ८-अ भरून घ्यावेत. आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून या प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग वाढवत मतदार नोंदणी करावी, असे आवाहन या पत्रात करण्यात आले आहे.
मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आवाहनही सर्व मतदार नोंदणी अधिकारी आणि सह मतदार नोंदणी अधिकारी, जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षणाधिकारी, ९५ बिग एफ एम रेडिओ चॅनलच्या कार्यक्रम प्रमुख यांना पत्राद्वारे करण्यात आले आहे.

