पुणे-पुणे, शिवाजीनगर, पिंपरी चिंचवड रेल्वे स्टेशन, बांद्रा आणि गेटवे ऑफ इंडीया बॉम्बने उडवुन देण्याची धमकी देणाऱ्या हडपसरच्या इलेक्ट्रिशिअन ला 12 तासातच पुणे पोलिसांनी पकडले. प्रविण पंडीत येशी वय ३५ वर्षे व्यवसाय इलेक्ट्रीशन रा. गंगोत्री कॉम्पलेक्स, महादेवनगर, मांजरी रोड, हडपसर असे या आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. १६ फेब्रुवारी २४ रोजी दुपारी पावणेदोन वाजता पोलिसांना फोन करून त्याने ,आपण आज सायंकाळी ५ वाजता पुणे रेल्वे स्टेशन, शिवाजीनगर, पिंपरी चिंचवड रेल्वे स्टेशन, बांद्रा आणि गेटवे ऑफ इंडीया बॉम्बने उडवून देणार असल्याची धमकी दिली होती.
या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि,’ दिनांक १६/०२/२०२४ रोजी १३/४४ वा. डायल ११२ नंबरवर अनोळखी इसमाने त्याचे मोबाईल नंबर वरुन फोन करुन सायंकाळी १७/०० वा. पुणे रेल्वे स्टेशन, शिवाजीनगर, पिंपरी चिंचवड रेल्वे स्टेशन, बांद्रा आणि गेटवे ऑफ इंडीया बॉम्बने उडवून देण्याची धमकी देऊन सरकारी यंत्रणेला वेठीस धरले म्हणुन पोलीस नियंत्रण कक्ष, पुणे शहर येथील महिला पोलीस अंमलदार कल्पना घरजाळे यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्यावरुन बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.५१/२०२४ भा.द.वि.कलम १८२ (ब). ५०६(२),५०५ (ब),५०७ प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उप-निरीक्षक लोहार यांचेकडे देण्यात आला.
यातील आरोपीचे कॉलवरुन तात्काळ दखल घेऊन बंडगार्डन पोलीस स्टेशनकडुन बांद्रा आणि गेटवे ऑफ इंडीया मुंबई व पिंपरी चिंचवड रेल्वे स्टेशन, यांचा समावेश असल्याने तेथील पोलिस आयुक्तालय यांना तात्काळ कळवुन बी.डी.डी. एस. पथकाकडून पुणे रेल्वे स्टेशन व शिवाजीनगर परीसराची तपासणी करण्यात आली परंतु संशयीत काही एक मिळुन आले नाही. तसेच यातील आरोपीचा शोध घेणेसाठी तात्काळ २ पथके तयार करुन त्यांनी यातील आरोपीचे मोबाईल नंबर वरुन सदर आरोपीचा हडपसर पोलीस स्टेशनचे स्टाफचे मदतीने शोध घेतला असता आरोपी प्रविण पंडीत येशी वय ३५ वर्षे व्यवसाय इलेक्ट्रीशन रा. गंगोत्री कॉम्पलेक्स, महादेवनगर, मांजरी रोड, हडपसर, पुणे याला दिनांक १७/०२/२०२४ रोजी ००/३० वा. अटक करण्यात आलेली आहे. त्याचेकडे प्रथमदर्शनी केलेले तपासामध्ये त्याने सदरचे केलेले कृत्य हे कौटुंबीक कलहातुन आलेल्या नैराश्यामधुन केल्याचे सांगीतले आहे. या आरोपीला न्यायालयामध्ये हजर करुन त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन आणखी सखोल तपास बंडगार्डन पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रविण पवार, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, प्रविणकुमार पाटील,पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त, लष्कर विभाग पुणे शहर संजय सुर्वे, बंडगार्डन पोलीस स्टेशनचे व.पो.नि संदिपान पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, पो. अंमलदार घडे, पुराणे व म.पो.अं. रोमण यांचे पथकाने केली.

