पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. यासंबंधीचा एखादा ठोस निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज किंवा उद्या घेण्याच्या विचारात असल्याचा दावा केला जात आहे. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला व राज्यातील काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांनी मंगळवारीच शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवारांनी आपल्या गटाच्या खासदार व आमदारांसह महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे संकेत मिळत आहे. याची पुष्टी अद्याप काँग्रेस किंवा शरद पवारांच्या गटाने केली नाही.
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील असल्याचा निर्वाळा दिला आहे. शरद पवार गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. पण तत्पूर्वीच शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यासंबंधीचा ठोस निर्णय शरद पवार आज किंवा उद्या घेतील असा दावा केला जात आहे. शरद पवार यांनी बुधवारी सकाळी आपल्या गटाच्या नेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीला शरद पवार गटाचे सर्वच खासदार व आमदारांसह महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे म्हटले जात आहे.
दुसरीकडे, शरद पवार गटाचे नेते मंगलदास बांदल यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना यासंबंधी एक महत्त्वाचे विधान केले आहे. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार का? हा राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे. मी छोटा कार्यकर्ता आहे. पण चर्चा सुरू आहे. यासंबंधीचा निर्णय लवकरच सर्वांना कळेल, असे त्यांनी म्हटले आहे. यामुळेही शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कालच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या धक्कातंत्रामुळे काँग्रेस पुरती हादरली आहे. त्यातच शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा सुरू झाल्याने काँग्रेसला राज्यासह देशात मोठी उभारी मिळण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला व अन्य बड्या नेत्यांनी मंगळवारीच शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवारांनी आपल्या गटाच्या नेत्यांची पुण्यात बैठक बोलावली होती. या बैठकीत राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे संकेत मिळत आहे. याची पुष्टी काँग्रेस किंवा शरद पवारांच्या गटाच्या एखाद्या मोठ्या अद्याप केली नाही. पण राज्याच्या राजकीय वर्तुळात ही चर्चा चांगलीच रंगली आहे हे मात्र खरे.

