मुंबई-इंदिरा गांधी ,राजीव गांधी यांच्या अत्यंत निकटवर्तीयांत होते अशा निष्ठावंत आणि माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण त्यांचे पुत्र माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक तोंडावर असताना सोमवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन आपल्या पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. या घटनाक्रमामुळे काँग्रेसमध्ये खळबळ माजली असून, नाना पटोले तातडीने पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झालेत.
अशोक चव्हाण काय म्हणाले राजीनाम्यात?
मी दिनांक 12/02/2024 रोजी मध्यान्हापासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा याद्वारे सादर करीत आहे, असे अशोक चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सादर केलेल्या आपल्या पक्ष सदस्यत्वाच्या राजीनाम्यात म्हटले आहे. या पत्रावर अशोक चव्हाण यांनी माजी विधानसभा अध्यक्ष असा उल्लेख केला आहे. त्यामुळे त्यांनी पक्ष सदस्यत्व सोडण्यापूर्वीच आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. अशोक चव्हाण यांनी एका ट्विटद्वारे आपल्या राजीनाम्याची पुष्टी केली आहे
अमित शहांच्या उपस्थितीत भाजपत जाणार?
भाजपच्या मुंबई स्थित कार्यालयाबाहेर मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचे बॅनर लावण्यात आलेत. त्यामुळे अशोक चव्हाण आज किंवा उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा केला जात आहे. ते भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर जाणार असल्याचीही चर्चा आहे.
गत अनेक दिवसांपासून सुरू होती चर्चा
गत अनेक महिन्यांपासून अशोक चव्हाण भाजपत जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण त्यांनी या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले होते. पण आता अचानक त्यांनी विधानसभा सदस्यत्व व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन महाराष्ट्रात एकच खळबळ उडवून दिली. अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर आता ते लवकरच भाजपमध्ये जाहीर प्रवेश करतील असा दावा केला जात आहे. अशोक चव्हाण काँग्रेसचे बडे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याच्या वृत्तामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये एकच खळबळ माजली आहे.
नांदेडमधील अशोक चव्हाण यांच्या गोटातील कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाण भावी खासदार असे स्टेटस ठेवले आहे. त्यामुळे ते भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर जाणार असल्याचीही चर्चा आहे.