पुणे –पुणे शहरातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पत्नीने केलेल्या मारहाणीत बांधकाम व्यावसायिक असलेल्या पतीचा मृत्यू झाला. घरगुती भांडणातून वाद झाल्यानंतर पत्नीने पतीच्या तोंडावर ठोसा मारला. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वानवडीतील एका उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला.
निखिल पुष्पराज खन्ना (वय 36) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांची पत्नी रेणुका निखिल खन्ना (वय 38) यांना वानवडी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.याप्रकरणी अधिक माहिती अशी की, निखिल आणि त्यांची पत्नी रेणुका यांचा सहा वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला होता. दरम्यान आज दुपारच्या सुमारास दोघांमध्ये भांडण झाले. रागाच्या भरात रेणुकाने पतीच्या तोंडावर ठोसा मारला.
त्यानंतर तिने फोन करून सासरे असलेल्या डॉक्टर खन्ना यांना याची माहिती दिली. डॉक्टर खन्ना घरी आले आणि त्यांनी निखिल यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. आणि निखिल यांचा मृत्यू झाला होता.मयत निखिल हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक आहेत. वानवडी परिसरातील एका उच्चभूमी सोसायटीत आई-वडील पत्नी असे चार जण ते राहतात. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर वानवडी पोलिसांनी रेणुकाला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सुरू आहे.

