महाराष्ट्र गंधर्व नाट्य संगीत २०२४ स्पर्धेचा पारितोषिक वितरण संपन्न
पुणे : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये संगीत नाटकांचे मोठे योगदान आहे. आजच्या काळामध्ये मात्र काही कारणास्तव रसिक संगीत नाटकांपासून दूर गेले आहेत या रसिकांना पुन्हा संगीत नाटकांकडे वळविण्यासाठी तरुण कलाकारांनी संगीत नाटकांमध्ये रस घेणे गरजेचे आहे, अशा तरुण कलाकारांपर्यंत स्पर्धेच्या माध्यमातून संगीत नाटक पोहोचविता येते, त्यांच्यामुळेच संगीत नाटकांची महान परंपरा पुढे सुरू राहणार आहे, अशी भावना ज्येष्ठ गायक पं. सुहास व्यास यांनी व्यक्त केले.
भरत नाट्य संशोधन मंदिर आणि लायन्स क्लब पुणे सहकारनगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गंधर्व नाट्यसंगीत स्पर्धेचे पारितोषिक वितरण सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिर येथे सुहास व्यास यांच्या हस्ते करण्यात आले. लायन्स क्लब माजी प्रांतपाल चंद्रशेखर शेठ, आनंद आंबेडकर, स्पर्धेचे संयोजक डॉ प्रसाद खंडागळे, भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, राजीव परांजपे, अभय जबडे, लायन्स अध्यक्ष श्रद्धा शाह, दुर्गम प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार जाधव आदी यावेळी उपस्थित होते. माजी आमदार प्रकाश देवळे, निर्माते अशोक जाधव, ह. भ. प. नारायण गोसावी, भारत विकास परिषद स्वारगेट अध्यक्ष माणकचंद बाहेती , श्रद्धा शाह,राजेंद्र बलकवडे, रविन्द्र पठारे, सुनिल जाधव, मोहित पोटे, विकास माने यांच्या उपस्थितीत उदघाटन झाले .
पं. सुहास व्यास म्हणाले, अभिजात संगीतातील राग लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य संगीत नाटकाने केले आहे, संगीत नाटकाने मराठी माणसांचे मन सर्जनशील केले आहे, आजच्या कलाकारांनी इतर कलाकारांची कॉपी करून गाण्यापेक्षा स्वतःची छाप गाण्यांमध्ये उमटवणे गरजेचे आहे, त्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा महत्त्वाचे काम करतात, या उभरत्या कलाकारांनी संगीत नाटकांमध्ये झोकून देऊन काम केले तर पुन्हा एकदा मराठी संगीत नाटकांना सोन्याचे दिवस येतील असा विश्वास सुहास व्यास यांनी व्यक्त केला.
चंद्रशेखर शेठ म्हणाले, भरत नाट्यमंदिर या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ही कलाकारांना मोठे व्यासपीठ मिळवून देत आहे, त्यामुळे केवळ मराठी संगीत नाटकांनाच नव्हे तर मराठी केलेला अनेक नवीन कलाकार मिळत आहेत, त्यांचे प्रोत्साहन वाढविण्याची संधी आम्हाला भरत नाट्य मंदिर मिळवून देत आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. नवीन कलाकार जर संगीत नाटकांकडे वळाले तर निश्चितच पुन्हा रसिकही संगीत नाटकांकडे वळतील आणि महाराष्ट्राची ही महान परंपरा भविष्यातही कायम राहील.
या स्पर्धेमध्ये राजीव परांजपे, सुनिता गुणे, क्षमा गोडसे, ऋषिकेश बडवे यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. विविध वयो गटात रोख बक्षिसे व ट्रॉफी देण्यात आल्या . गट क्रमांक १ (८ ते १५ वर्षे ) प्रथम क्रमांक- नील चाफेकर द्वितीय क्रमांक-सई बिडकर उत्तेजनार्थ-स्वरा किंबहुने, स्वरा भागवत, ईशानी हिंगे, गट क्रमांक २ (१६ ते ४० वर्षे) प्रथम क्रमांक-अभिषेक शिंदे, द्वितीय क्रमांक-मानसी चक्रदेव, स्वराली सांबारे (विभागून) उत्तेजनार्थ – वरद दलाल, अर्णव पुजारी, गायत्री कुलकर्णी, मंगेश आबनावे, सानिका फडके, गट क्रमांक ३ (४१ ते ६० वर्षे ) प्रथम क्रमांक- बिल्वा द्रविड, द्वितीय क्रमांक- सीमा जोशी उत्तेजनार्थ- मंजिरी काळे, देवयानी गडीकर,गट क्रमांक ४ (६१ वर्षा पुढील) प्रथम क्रमांक- दिलीप कुलकर्णी या स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये पारितोषिके पटकावली.
स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी अतिशय तयारीने सादरीकरण केले व उपस्थितांची मने जिंकली. या वेळी लोकप्रिय नाट्य गीता बरोबर अप्रचलित नाट्यगीते रसिकांना ऐकायला मिळाली. पं. राम मराठे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक डॉ प्रसाद खंडागळे यांनी केले. सूत्रसंचालन चारुलता पाटणकर व नीलम खंडागळे यांनी केले. आभार प्रदर्शन अभय जबडे यांनी केले.
संगीत नाटकांमध्ये तरुणांचा सहभाग वाढण्याची गरज -ज्येष्ठ गायक पं. सुहास व्यास
Date:

