पुणे महानगरपालिका यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त यंदा प्रथमच महापौरांच्या पुढाकारातून पुस्तक वितरणाचा अभिनव व स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत अकरावीच्या विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या जीवनकार्य व विचारांवर आधारित पुस्तके वितरित करण्यात आली.

या कार्यक्रमास महापौर मंजूषा नागपुरे प्रमुख उपस्थित होत्या. तसेच विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम, आरपीआय गटनेते हिमाली कांबळे, शिक्षण समितीचे अध्यक्ष अरुण राजवाडे, नगरसेविका स्वप्नाली पंडित व अर्चना जगताप तसेच शिक्षण विभाग उपायुक्त वसुंधरा बारवे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते ॲड. क्षितिज गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व, शिक्षणाचे स्थान आणि सामाजिक बांधिलकी याबाबत प्रेरणादायी भाषण केले.
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे, तसेच समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांची जाणीव अधिक दृढ करणे हा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या अभिनव उपक्रमाचे शहरभर स्वागत होत असून, भविष्यातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक, शैक्षणिक व सामाजिक जागरूकता वाढविण्याचा मानस महानगरपालिकेने व्यक्त केला आहे.

