पुणे
महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर या महापुरूषांच्या काळात देखील फार मोठी प्रतिकुल परिस्थिती होती. त्याला तोंड देत सामाजिक आंदोलने उभी राहीली व परिवर्तन घडले. सामाजिक चळवळी दडपण, दबावाला न जुमानता, सामाजिक न्यायासाठी वारंवार निर्माण होतच राहतील, असा विश्वास गांधी दर्शन शिबीरात व्यक्त करण्यात आला.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानावर विशेष व्याख्याने गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे रविवार दि. १२ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. गांधी विचार दर्शन मालिकेतेतील या ३०व्या पुष्पात ‘महात्मा फुले यांच्या कार्याची सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी’ या विषयावर सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासन केंद्राचे विश्वनाथ शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक दृष्टीकोन’ या विषयावर मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य, प्राध्यापक प्रा. पी. विठ्ठल आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भूमी अधिकार’ या विषयावर युवा भारत आंदोलनचे सल्लागार शशी सोनावणे यांचे व्याख्यान झाले.
विश्वनाथ शिंदे म्हणाले की, महात्मा फुले यांच्या काळात पुरोहित सांगतील तो धर्म, न्याय मानला जायचा. धर्मग्रंथांना कायद्याचे स्वरूप आले होते. त्या विरोधात बोलणे म्हणजे परमेश्वरा विरोधात बोलण्यासारखे होते. धर्माच्या नावाखाली भोंदूगिरी सुरू होती. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, नैतिक दृष्ट्या समाज निकृष्ट अवस्थेत पोहोचला होता. अशा काळात महात्मा फुले यांनी विविध प्रकारच्या चळवळी उभ्या केल्या. त्या सगळ्यांच्या पाठीमागे सत्यान्वयी दृष्टिकोन होता.
विश्वनाथ शिंदे पुढे म्हणाले की, जनतेचा, सुधारकांचा आवाज बंद करायचे धोरण राज्यकर्ते करत आहेत. एकहाती सत्ता असावी असे राज्यकर्त्यांना वाटते. लोक मूग गिळून गप्प बसतात तो पर्यंत हे असेच चालू राहणार. पण पुन्हा चळवळी न्यायासाठी आवाज उठवतील. संघटितपणे लोक एकत्र येऊन चुकीच्या धोरणांना विरोध करतील.
प्रा. पी. विठ्ठल म्हणाले की, शिक्षण सर्वांसाठी खुले असावे अशी महात्मा फुले यांची धारणा होती. तोच विचार बाबासाहेबांनी पुढे नेला. समाज शिक्षित झाला तरच समाज पुढे जाईल. म्हणून समतेवर आधारित शिक्षण असावे. शिक्षणामुळे माणूस स्वाभिमानी होतो. तर्कशूध्द आचरण करतो. जाती रचना हा समाजातील मोठा दोष आहे. मुक्ती साधायची असेल तर बुध्द धर्मात प्रवेश करा असा संदेश बाबासाहेबांनी दिला होता. आत्ताच्या पिढीने महापुरुषांशी नाते सेल्फी काढण्यापुरते जोडले आहे. शिक्षण हे फक्त नोकरी मिळवण्यासाठी नाही याचे भान सर्वांनी ठेवायला हवे.
शशी सोनवणे की, जमीनीचे राष्ट्रीयीकरण करणे, सुधारणा, फेर वाटप हा मुद्दा 1918 साली बाबासाहेब आंबेडकरांनी अधोरेखित केला होता. सामाजिक समतेकडे जायचे असेल तर जमिनीचे राष्ट्रीयीकरण झाले पाहिजे. सर्व समाजाच्या हाती नैसर्गिक संसाधनांची मालकी राहिली पाहिजे. जातीय उतरंड, शोषणाची उतरंड त्यातून दूर केली जाऊ शकते.
असे त्यांचे मत होते. जमिनीवरचा अधिकार प्रस्थापित करण्याचे मोठे संघर्ष भारतात झाले. प्रा. शशी सोनवणे पुढे म्हणाले की, भारतातील मुलभूत उद्योगांचे राष्ट्रीयीकरण करावे असे आम्हाला वाटते.
भांडवलशाही हे संकट आहे. नैसर्गिक संसाधनांवर कब्जा मिळवून भांडवलदार सत्ता गाजवतात.
लक्ष्मिकांत देशमुख म्हणाले की, सर्वांना सक्तीचे व मोफत शिक्षण दिले पाहिजे असे हंटर कमिशन पुढे महात्मा फुले यांनी मांडले. तोच आग्रह बाबासाहेबांनी धरला. विवेकाचे अधिष्ठान असलेला समाज निर्माण झाला पाहिजे. शिक्षणातून समानता निर्माण झाली पाहिजे या ध्येयापासून आपण खूप दूर आहोत.
सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांच्या पासून वंचित असलेल्या समाजासाठी लढायचे यावर आम्ही युक्रांदमध्ये चर्चा करायचो, अशी आठवण सांगत अन्वर राजन म्हणाले की, समाजात जेव्हा न्याय असतो, तेव्हा शांतता असते. आपली समाज रचना विषमतावादी आहे. त्यामुळे शांतता नाही. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत गांधी, आंबेडकर यांनी आंदोलने केली. आत्ताच्या वातावरणात देखील ठामपणे उभे राहण्याची युक्रांदची भुमिका आहे. गांधीजींच्या मार्गाने आपल्याला जावे लागेल.
लक्ष्मिकांत देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तेजस भालेराव यांनी सुत्रसंचलन केले. सुरज कुलकर्णी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रविण सप्तर्षी यांनी आभार मानले.
कार्यक्रमात गानकोकिळा आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

