पुणे-राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंगवेळी पायलकडून एक मोठी चूक झाल्याची घटना आज पुण्याच्या पुरंदर तालुक्यात घडली. पायलटने हेलिकॉप्टर नियोजित हेलिपॅडवर उतरवण्याऐवजी चक्क कार पार्किंगमध्ये उतरवले. या घटनेमुळे घटनास्थळी काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पण भुजबळ हा प्रकार बाजूला सोडून आपल्या नियोजित कार्यक्रमाच्या दिशेने पुढे निघून गेले.
पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री छगन भुजबळ या कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने आले होते. त्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी स्वतंत्र हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती. पण पायलटचा खानवडी गावातील मोकळी जागाच हेलिपॅड असल्याचा समज झाला आणि त्याने त्या मैदानातच भुजबळांचे हेलिकॉप्टर उतरवले. या मैदानापासूनच काही अंतरावरच हेलिपॅड होते. हेलिकॉप्टर चुकीच्या ठिकाणी उतरल्याचे पाहून तिथे हजर असलेल्या नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. पण कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही.
पोलिसांनी तत्काळ पायलटला योग्य ती माहिती दिली. त्यानंतर हेलिकॉप्टर तेथून हलवण्यात आले. तत्पूर्वी, भुजबळ कारने तेथून कार्यक्रमाच्या दिशेने निघून गेले.
या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली आीहे. हेलिपॅड आकाशातून स्पष्ट दिसत होते का? पायलटकडून नेमकी कशी वा का झाली? काही तांत्रिक अडचण होती का? अशा विविध प्रश्नांची उत्तरे या प्रकरणी शोधली जाणार आहेत. दरम्यान, या घटनेमुळे व्हिआयपी लोकांची सुरक्षा व समन्वय या प्रकरणी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ते एका पोस्टमध्ये म्हणाले, छगन भुजबळ साहेब यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचं हेलीकॉप्टर हेलिपॅडऐवजी अचानक एका पार्किंगमध्ये उतरवण्यात आल्याची बाब ही अतिशय गंभीर आहे. त्यामुळंच मी सातत्याने सांगतोय की, महत्त्वाच्या व्यक्तींनी प्रवास करताना काळजी घ्यायला हवी. अनेक विमानं आणि हेलिकॉप्टरर्समध्ये देखभालदुरुस्तीसह इतरही अनेक त्रुटी आहेत. आज सुदैवाने अपघात टळला पण म्हणून शासनानेही एवढा हलगर्जीपणा करणं योग्य नाही. विमान, हेलीकॉप्टर्सने प्रवास करताना सरकार यापुढं काळजी घेईल, ही अपेक्षा.

