पुणे: लोहगाव परिसरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार बापूसाहेब पठारे यांनी पुणे महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या व नगरसेवकांसमवेत बैठक घेतली. बैठकीत सध्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेत विविध अडचणी, प्रलंबित कामे व भविष्यातील गरजा यावर सखोल चर्चा पार पडली.
बैठकीनंतर वॉटर पार्क रोड परिसरात प्रस्तावित पाणीपुरवठा टाकीसाठी उपलब्ध जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या ठिकाणी नवीन टाकी उभारल्यास परिसरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम व नियोजित पद्धतीने करता येईल, या दृष्टीने अधिकाऱ्यांना पठारे यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच हरणतळे, लोहगाव बाजारतळ, पवार वस्ती स्मशानभूमी परिसर, लोहगाव ईव्ही बस डेपो तसेच निंबाळकर नगर या भागांमध्ये सुरू असलेल्या पाणीपुरवठा टाक्यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. लोहगावमध्ये सुरू असलेल्या पाण्याच्या टाक्यांची कामे नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत व नागरिकांना लवकरात लवकर त्याचा लाभ मिळावा, यासाठी कामांना गती देण्याचे पठारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.
लोहगाव भागात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या पाणीपुरवठा नलिकांच्या कामांबाबतही चर्चा करण्यात आली. नलिका जाळे अधिक सक्षम करून पाणीपुरवठ्यातील अडचणी दूर करण्यावर भर देण्यात आला. आमदार पठारे पुढे म्हणाले, “लोहगावमधील पाणीप्रश्न सोडवणे ही आपली प्राथमिकता आहे. नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळावा यासाठी प्रशासनासोबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. दीर्घकालीन उपाययोजनांच्या माध्यमातून हा प्रश्न निश्चितच मार्गी लागेल.”
या प्रसंगी नगरसेविका ऐश्वर्या पठारे, नगरसेवक रामदास दाभाडे, प्रितम खांदवे तसेच महानगरपालिकेचे विरेंद्र केळकर (अधिक्षक अभियंता), एकनाथ गाडेकर (कार्यकारी अभियंता), सुनिल मुळे (उपअभियंता), राजेंद्र नगरे (उपअभियंता), अमृता खाडे (कनिष्ठ अभियंता), शुभम घाटकर (कनिष्ठ अभियंता) व लोहगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

