मथुरा जिल्ह्यातील वृंदावन येथे यमुना नदीत ३० पर्यटकांना घेऊन जाणारी एक स्टीमर उलटली. या अपघातात दहा पर्यटक बुडून मरण पावले. त्यांपैकी सहा महिला आणि चार पुरुष होते. जहाजावरील सर्व पर्यटक पंजाबहून आले होते.
जिल्हा दंडाधिकारी चंद्र प्रकाश सिंह यांनी सांगितले की, हा अपघात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास श्री बांके बिहार मंदिरापासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या केसी घाटावर झाला. बचाव आणि मदत कार्यासाठी लष्कर दाखल झाले आहे.
पन्नास स्थानिक डायव्हर्सदेखील शोधकार्यात गुंतले आहेत. जखमींना रामकृष्ण मिशन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर मोफत उपचार केले जातील. गाझियाबादहून एनडीआरएफचे एक पथकही वृंदावनमध्ये दाखल झाले आहे.
जिल्हा दंडाधिकारी शैलेश पांडे यांनी सांगितले,दोन स्टीमरमधून पर्यटक प्रवास करत होते. त्यापैकी एक स्टीमर उलटली, ज्यात २५ ते २७ लोक होते. दहा जणांचा मृत्यू झाला. १२ जणांना सुखरूप वाचवण्यात आले. तीन ते पाच जण अजूनही बेपत्ता आहेत. बचाव पथके शोधकार्य सुरू ठेवत आहेत.

