पुणे-
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आता राजकीय ठिणगी पडली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी करुणा मुंडे यांनी आपला अर्ज कायम ठेवत निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. बारामती पोटनिवडणुकीत माझा अर्ज बाद करण्यासाठी धनंजय मुंडेंनी मुंबईहून वकील पाठवला होता, असे त्या म्हणाल्यात. करुणा मुंडेंच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी माघार घेतली. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनीही आपला अर्ज मागे घेतल्याने राजकीय समीकरणांमध्ये बदल झाला आहे. एकूण 53 उमेदवारांपैकी तब्बल 30 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 23 उमेदवार रिंगणात उरले आहेत. बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले आणि करुणा मुंडे-शर्मा यांचे अर्ज कायम आहेत.
करुणा मुंडे यांनी आज माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर थेट निशाणा साधला. “धनंजय मुंडे यांनी माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी मुंबईहून एक नामवंत वकील पाठवला होता. माझ्या प्रतिज्ञापत्रात त्यांची मालमत्ता का दाखवली नाही, असा आक्षेप त्या वकिलाने घेतला. एकीकडे मुंडे म्हणतात की मी त्यांची पत्नी नाही, तर दुसरीकडे वकिलामार्फत माझ्या अर्जावर मालमत्तेवरून आक्षेप घेतात,” असा दावा करुणा शर्मा यांनी केला. तसेच, अर्ज मागे घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या तीन मोठ्या नेत्यांचे फोन आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
करुणा शर्मा यांनी यावेळी बारामतीची पोटनिवडणूक लढवण्यामागचे कारण देखील सांगितले. जर अजितदादांच्या अपघाताचा एफआयआर (FIR) दाखल झाला असता, तर मी उमेदवारी मागे घेतली असती, असे त्यांनी म्हटले. इतक्या मोठ्या व्यक्तीच्या अपघाताची तक्रार जर घेतली जात नसेल, तर उद्या माझ्यासोबत काही विपरीत घडले तर कुणाला सांगायचे? म्हणूनच मी ही निवडणूक लढवत असल्याचे करुणा मुंडे यांनी स्पष्ट केले.
करुणा मुंडे यांनी पुढे स्पष्ट केले की, निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या मोठ्या तीन लोकांचे फोन आले होते. मात्र मी ही निवडणूक लढवणार असून, घरोघरी जाऊन प्रचार करणार आहे. तसेच पदयात्रा देखील करणार आहे. करुणा मुंडेंच्या या आक्रमक भूमिकेमुळे बारामतीतील निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 30 मार्च 2026 रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 6 एप्रिल होती, तर 7 एप्रिल रोजी छाननी पार पडली. आज 9 एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. आता 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी केली जाईल. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 6 मे 2026 पर्यंत पूर्ण केली जाणार आहे.

